इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर हा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री डुलक्या घेताना दिसून आले. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रवी शास्त्रींचा याआधीही डुलक्या घेतानाचा एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. तेव्हा त्यांना ट्रोल करण्यात आले होते. आता व्हायरल झालेल्या फोटोवरही नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लवकरच भारतीय क्रिकेट संघामध्ये मोठे बदल होणार आहेत. टी २० वर्ल्डकपनंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या सदस्यांमध्ये बरेच बदल होणार असल्याचे समोर आले आहे. संघाचे सहाय्यक कर्मचाऱ्यामध्येही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री प्रशिक्षक पदापासून दूर होणार आहेत. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर हे बदल होणे अपेक्षित आहे.

 

 

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएईमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघापासून वेगळे होणार आहेत. या सर्वांचा करार टी-२० वर्ल्डकपपर्यंत आहे.

हेही वाचा – VIDEO : जय हिंद..! विराट कोहलीनं इंग्लंडमध्ये फडकावला तिरंगा, शास्त्रींसमवेत संघही होता हजर

शास्त्री मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली भारत

रवी शास्त्री हे पहिल्यांदा डायरेक्टर म्हणून २०१४ मध्ये भारतीय संघासोबत जोडले गेले होते. त्यांचा करार २०१६ पर्यंत होता. यानंतर अनिल कुंबळेंना एक वर्षासाठी प्रशिक्षक बनवण्यात आले. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या पराभवानंतर रवी शास्त्री भारतीय संघाचे पूर्णवेळ प्रशिक्षक बनले. शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मालिका जिंकली आणि त्यानंतर गेल्या महिन्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत खेळली.