जेव्हापासून रोहित शर्माने कसोटीत सलामीवीराची जबाबदारी सांभाळली आहे, तेव्हापासून त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. भारतात अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या रोहितने इंग्लंडमध्येही आपल्या उत्तम फलंदाजीचे दर्शन घडवले आहे. हिटमॅनने ओव्हल कसोटीत शानदार शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीचे आठवे आणि परदेशी भूमीवरील पहिले शतक आहे. लॉर्ड्स कसोटीत रोहित शर्मा शतकापासून वंचित राहिला होता, पण ओव्हलमध्ये त्याने संधी जाऊ दिली नाही.

९४ धावांवर खेळत असताना रोहितने मोईन अलीच्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. रोहित शर्माने २०४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच ५० पेक्षा कमी स्ट्राईक रेटने शतक झळकावले आहे. इतकेच नव्हे, तर विदेशात खेळताना ८३ ही रोहितची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या होती. याच मालिकेच्या लॉर्ड्स कसोटीत त्याने या धावा ठोकल्या होत्या.

 

 

 

हेही वाचा – ENG vs IND : कारकिर्दीच्या पुस्तकात ‘हिटमॅन’नं लिहिलं नवं पान; ओव्हल टेस्टमध्ये रचले रेकॉर्डवर रेकॉर्ड!

रोहित शर्माचे हे शतकही खूप खास आहे, कारण समीक्षकांनी अनेकदा त्याच्या तंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या मालिकेपूर्वी त्याच्या अपयशाचा अंदाज वर्तवला जात होता, पण रोहितने सर्व टीकाकारांचे तोंड बंद केले आहे.