लंडनमधील कॅनिंग्टन ओव्हलवर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीचा तिसरा दिवस पूर्णपणे भारतीय सलामीवीर रोहित शर्माच्या नावावर होता. पहिल्या ९९ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर रोहितने परदेशी भूमीवर आपल्या पहिल्या कसोटी शतकाच्या आधारे भारतीय संघाला आधार दिला. त्याने प्रथम सलामीवीर केएल राहुलसह ८३ धावांची भक्कम भागीदारी केली आणि नंतर चेतेश्वर पुजारासह १५३ धावा जोडल्या.. रोहितने या सामन्यात आपले शतक पूर्ण करताच त्याचे तीन वर्षांचे ट्वीट व्हायरल झाले.
२०१८मध्ये इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्माला भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आले होते. त्यावेळी कसोटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी अत्यंत खराब होती. या ट्वीटमध्ये रोहितने ‘उद्या पुन्हा सूर्य उगवेल’ असे लिहिले होते.
Sun will rise again tomorrow
— Rohit Sharma (@ImRo45) July 18, 2018
हेही वाचा – ENG vs IND 4th Test : ‘गुरू’शिवाय खेळतेय विराटसेना, चौथ्या दिवसाच्या थराराला सुरूवात!
रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शानदार फलंदाजी करत टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले. त्याने ओव्हलमध्ये १२७ धावा केल्या. या खेळीत त्याने १४ चौकार आणि एक षटकार ठोकला. ९४ धावांवर असताना रोहितने षटकार ठोकत आपले आठवे कसोटी शतक पूर्ण केले.
‘हिटमॅन’ रोहितने इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत मजबूत बचावात्मक तंत्र दाखवले, पण या कसोटीत त्याने आपली आक्रमकताही दाखवली. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितला विदेशात शतक ठोकण्यासाठी आठ वर्षे आणि ४३ कसोटी सामने लागले.