England tour of india 2021 : भारत-इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे प्रारंभ होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकताच झालेल्या कसोटी मालिकेत भारताने २-१ असे यश संपादन केले, तर इंग्लंडनेसुद्धा श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत २-० अशी धूळ चारली. त्यामुळे या मालिकेकडे तमाम क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. यातील दोन कसोटी सामने चेन्नईत, उर्वरित दोन सामने आणि टी-२० मालिका अहमदाबाद तर वन-डे मालिका पुण्यात रंगणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान अखेरची कसोटी मालिका २०१८ मध्ये झाली होती. ही मालिका इंग्लंड संघानं ४-१ च्या फरकानं जिंकली होती. २०२१ मध्ये होणारी कसोटी मालिका जिंकून भारतीय संघ पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. त्याआधी भारताचा माजी खेळाडू वसीम जाफर यानं पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड केली आहे.

आणखी वाचा- ‘विराट’ विक्रमासाठी सज्ज… धोनीचा मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत कोहली

जाफरने आपल्या संघात सलामीला रोहित शर्मा आणि शुबमन गिल याला संधी दिली आहे. तर अक्षर पटेल याला संघात स्थान देत सर्वांनाच धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अष्टपैलू खेळी करणाऱ्या वॉशिंगटन सुंदरला जाफरनं आपल्या संघात स्थान दिलं नाही. ऑस्ट्रेलियात आपल्या कामगिरीनं सर्वांचीच मनं जिंकणाऱ्या ऋषभ पंतकडे जाफरनं यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली आहे. तर मधल्या फळीत अनुभवी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना स्थान दिलं आहे. अश्विन आणि बुमराह यांनाही स्थान देण्यात आलं आहे.

असा आहे जाफरनं निवडलेला संघ –
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे और ऋषभ पंत, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव/शार्दुल ठाकुर, ईशांत शर्मा/मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह