भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने धडाकेबाज खेळी करत शतकी आघाडी घेतली. भारतीय संघाच्या १६५ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४८ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात न्यूझीलंडकडे १८३ धावांची आघाडी आहे. भारताकडून इशांत शर्माने ५ बळी घेत आपली कामगिरी चोख बजावली. मात्र या कामगिरीनंतरही इशांत शर्मा आपल्या कामगिरीवर खुश नाहीये.

“मी स्वतःच्या कामगिरीवर खुश नाहीये. मी गेल्या दोन दिवसांत पुरेसा झोपलो नाहीये. गोलंदाजीदरम्यान मला त्रास जाणवत होता. ज्या पद्धतीने मी गोलंदाजी करणं अपेक्षित आहे तसा मारा मी नाही केला. संघाला माझी गरज होती, आणी मी खेळलो. संघासाठी मी काहीही करु शकतो”, दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर इशांत पत्रकारांशी बोलत होता.

अवश्य वाचा – Ind vs NZ : बुमराहची प्रतीक्षा फळाला, घेतला महत्वाचा बळी

जसप्रीत बुमराहने तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच वॉटलिंगला माघारी धाडत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. मात्र यानंतर कॉलिन डी-ग्रँडहोम आणि जेमिसन यांनी ७१ धावांची भागीदारी रचत न्यूझीलंडची बाजू अधिक भक्कम केली. या भागीदारीदरम्यानच यजमान संघाने भारतावर शतकी आघाडी घेतली. आश्विनने जेमिसनला माघारी धाडत भारताला यश मिळवून दिलं. मात्र ट्रेंट बोल्टने अखेरच्या विकेटसाठीही फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. बोल्टने ३८ धावा केल्या. भारताकडून इशांतने ५, रविचंद्रन आश्विनने ३ तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.