न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी केली. न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश लावत भारतीय गोलंदाजांनी, यजमान संघाला १३२ धावांपर्यंतच मजल मारु दिली. रविंद्र जाडेजा-जसप्रीत बुमराह यांच्या माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज हतबल झालेले पहायला मिळाले. कर्णधार विराट कोहलीनेही या सामन्यात सुरेख क्षेत्ररक्षण करत दोन सुंदर झेल टिपले.

शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर विराटने मार्टीन गप्टील तर शिवम दुबेच्या गोलंदाजीवर कॉलिन मुनरोचा सुरेख झेल घेतला. मात्र यानंतर सामन्यात असं काही घडलं की विराट कोहलीला अक्षरशः आपलं तोंड लपवण्याची पाळी आली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने एक मोठा फटका खेळला, विराटला हा झेल घेण्याची सोपी संधी होती, मात्र त्याने ही गमावली. हा प्रसंग पाहिल्यानंतर बुमराहलाही विश्वास बसला नाही….अखेरीस विराटला आपलं तोंड लपवावं लागलं.

दरम्यान, मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरो जोडीने पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. ही जोडी भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच शार्दुल ठाकूरने गप्टीलला माघारी धाडलं. यानंतर काही काळाने कॉलिन मुनरोही माघारी परतला. कर्णधार केन विल्यमसनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जाडेजाने डी-ग्रँडहोम आणि विल्यमसन यांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं.

रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. भारताकडून रविंद्र जाडेजाने २ तर शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबेने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Story img Loader