भारतीय संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने पुण्यातील गहुंजे मैदानावरील दुसऱ्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. यानंतरही आफ्रिकेचे फलंदाज दुसऱ्या डावात अडखळताना दिसले. चौथ्या दिवशी सलामीवीर एडन मार्क्रमला इशांत शर्माने पायचीत करत माघारी धाडलं.

यानंतर उमेश यादवच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने डी-ब्रूनचा यष्टींमागे सुरेख झेल टिपला. हा झेल घेतल्यानंतर मैदानात उपस्थित भारतीय खेळाडूंनी आनंदाने जल्लोष केला.

सोशल मीडियावरही क्रिकेटच्या चाहत्यांनी साहाच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

क्रिकेटमध्ये Catches win matches अशी म्हण आहे. डी-ब्रूनचा झेल घेतल्यानंतर साहाने आफ्रिकन कर्णधार फाफ डु-प्लेसिसलाही अशाच पद्धतीने सुरेख झेल घेत माघारी धाडलं. दुसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर भारत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेईल, ज्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारताचं अव्वल स्थान कायम राहणार आहे.