मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत पाचव्या दिवशी विजय संपादन केला. दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचे आव्हान भारतीय संघाने दिले होते. भारतीय गोलंदाजांनी एकाही आफ्रिकन फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावण्याचा वेळ दिला नाही. आक्रमक गोलंदाजी करत भारताने आफ्रिकेचा डाव १९१ धावांत गुंडाळला आणि भारताला २०३ धावांनी विजय मिळवून दिला.

या पराभवानंतर आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस म्हणाला की भारतीय संघाने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. आम्हीदेखील आमचा पहिला डाव झुंजार पद्धतीने खेळलो. पण दुसऱ्या डावात मात्र आम्हाला खेळपट्टीवर स्थैर्य मिळवता आले नाही. दुसरा डाव आमच्यासाठी खूप कठीण गेला. रोहितने दमदार फलंदाजी केली. चौथ्या दिवसांपर्यंत आम्ही सामन्यामध्ये होतो. पण पाचव्या दिवसाच्या सुरूवातीलाच आम्ही सामना गमावण्यास सुरूवात केली. शमी सारखे गोलंदाज जेव्हा उत्तम दर्जाची गोलंदाजी करतात तेव्हा तुमच्या हातात केवळ तंबूत बसून ती उत्तम गोलंदाजी पाहणे एवढाच पर्याय उरतो. पाचव्या दिवशी सगळं अगदी झटपट झालं. पण त्यात कोणाचीही चूक नाही. पाचव्या दिवशीचे कसोटी क्रिकेट हे कायमच असे असते.

दरम्यान, पहिल्या डावात भारताने ५०२ धावांवर डाव घोषित केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून आफ्रिकेने पहिल्या डावात ४३१ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात पुन्हा धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे आफ्रिकेपुढे दीड दिवसांत डोंगराएवढे आव्हान होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना तळाच्या डेन पिटने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. त्याला इतर कोणाचीही साथ मिळू शकली नाही. त्यामुळे आफ्रिकेला सामना वाचवता आला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने ५, रविंद्र जाडेजाने ४ तर आश्विनने १ बळी घेतला.