भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील लोक पसंत करतात. याचे कारण म्हणजे तो जितका चांगला क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक आहे, तितकाच तो एक चांगला माणूस आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसर्‍या वनडे सामन्यात त्याच्या नम्रतेचा आणखी एक पैलू सर्वांनी पाहिला. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे हा सामना भारताच्या डावाच्या वेळी थांबवण्यात आला. तेव्हा द्रविड श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाशी चर्चा करताना दिसला. या दोघांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्याचे कौतुक केले.

राहुल द्रविडच्या या नम्रतेमुळे दोन्ही देशांचे चाहते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी ट्विटरवर जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या. बर्‍याच चाहत्यांनी असा टोलाही लगावला, की कदाचित राहुल द्रविडने आपली रणनिती दासुन शनाकाला सांगितली आणि यामुळे भारतीय संघाला तिसर्‍या वनडेत पराभवाला सामोरे जावे लागले.

 

 

 

 

 

 

श्रीलंकेसाठी शेवट ठरला गोड

तब्बल सहा बदल केलेल्या टीम इंडियाला श्रीलंकेने तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत ३ गड्यांनी पराभवाचे पाणी पाजले. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला, पण टीम इंडियाला पूर्ण षटकेही खेळता आली नाहीत. घाऊक बदल केलेली टीम इंडिया ४३.१ षटकात २२५ धावांवर आटोपली. लंकेकडून अकिला धनंजया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करत टीम इंडियाच्या डावाला सुरूंग लावला.

प्रत्युत्तरात लंकेकडून सलामीवीर अविष्का फर्नांडो, नवखा भानुका राजपक्षा यांनी झुंजार खेळी करत सामना जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या दोघांनी अर्धशतकी खेळी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. टीम इंडियाने ही वनडे मालिका २-१ अशी खिशात टाकली आहे. अविष्काला सामनावीर तर मुंबईकर सूर्यकुमार यादवला मालिकावीर पुरस्कार मिळाला.