कटकच्या मैदानावरील अखेरच्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अखेरच्या १० षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. एका क्षणाला ३०० धावांच्या आत विंडीजचा डाव संपेल असं वाटत असतानाच संघाने ३१५ धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत वारेमाप धावा दिल्या. नवदीप सैनीने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात दोन बळी घेतले. त्याला रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने १-१ बळी घेऊन चांगली साथ दिली.

शमीने यादरम्यान ऐतिहासिक कामगिरी करत अव्वल स्थान पटकावलं आहे. २०१९ वर्षात वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमीने आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. वर्षाच्या अखेरीच्या शमीच्या खात्यात ४२ बळी जमा आहेत.

२०१९ वर्षाच्या अखेरीस वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे सर्वोत्तम ५ गोलंदाज –

  • मोहम्मद शमी – भारत – ४२ बळी
  • ट्रेंट बोल्ट – न्यूझीलंड – ३८ बळी
  • लॉकी फर्ग्यसुन – न्यूझीलंड – ३५ बळी
  • मुस्तफिजूर रेहमान – बांगलादेश – ३४ बळी
  • भुवनेश्वर कुमार – भारत – ३३ बळी

महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही शमीने अशी कामगिरी करुन दाखवली होती.

निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर, वेस्ट इंडिजने अखरेच्या वन-डे सामन्यात ३१५ धावांपर्यंत मजल मारली आहे. अखेरच्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत विंडीजला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही, मात्र अखेरच्या षटकांमध्ये पूरन आणि पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. निकोलस पूरनने ८९ तर पोलार्डने नाबाद ७३ धावा केल्या.