भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा यंदाच्या वर्षात चांगल्याच फॉर्मात आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात रोहितने श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्याचा विक्रम मोडीत काढला आहे. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. फलंदाजी दरम्यान ९ वी धाव काढत रोहित एका कॅलेंडर वर्षात सलामीवीर या नात्याने सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम मोडला आहे.

लंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने १९९७ साली सलामीवीर या नात्याने २३८७ धावा काढल्या होत्या, आता हा विक्रम रोहितच्या नावे जमा झाला आहे.

दरम्यान, निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर, वेस्ट इंडिजने अखरेच्या वन-डे सामन्यात ३१५ धावांपर्यंत मजल मारली आहे. अखेरच्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत विंडीजला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही, मात्र अखेरच्या षटकांमध्ये पूरन आणि पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. निकोलस पूरनने ८९ तर पोलार्डने नाबाद ७३ धावा केल्या.