अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर, जमैका कसोटीवरही भारतीय संघाने आपली पकड मजबूत बसवली आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात २६४ धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार विराट कोहली आणि मयांक अग्रवाल यांनी अर्धशतकी खेळी करत भारतीय डावाला आकार दिला. विराट कोहलीने १६३ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १० चौकारांचा समावेश होता. या खेळीसोबत विराट कोहलीने ब्रायन लाराला मागे टाकलं आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने ७५ किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता चौथ्या स्थानावर पोहचला आहे. विराटची ही २४ वी अर्धशतकी खेळी ठरली.

पहिल्या दिवसाअखेरीस हनुमा विहारी ४२ धावांवर तर ऋषभ पंत २७ धावांवर खेळत होता.