संपूर्ण भारत आज आपला ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने लंडनमध्ये तिरंगा फडकवला. त्याच्यासोबत प्रशिक्षक रवी शास्त्री, संघाचे इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सर्व सदस्य होते. टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये आहे आणि कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळत आहे.

रविवार १५ ऑगस्टच्या निमित्ताने टीम इंडियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये विराट तिरंगा फडकवताना दिसत आहे. प्रशिक्षक शास्त्रीही त्यांच्यासोबत उभे आहेत. या एक मिनिट ४० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे खेळाडूही राष्ट्रगीत गात आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो चाहत्यांनी पाहिला आहे.

 

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत दोघांमध्ये पाच सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना नॉटिंगहॅममध्ये पाऊस आणि खराब हवामानामुळे अनिर्णित राहिला. दुसरा कसोटी सामना लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे.

हेही वाचा – १५ ऑगस्ट : महेंद्रसिंह धोनीच्या ‘स्टाइल’मध्ये विराट कोहलीचीही निवृत्ती?

भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात

लॉर्ड्स कसोटीचा आज चौथा दिवस आहे. भारताने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि लोकेश राहुल स्वस्तात माघारी परतले आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने दोघांनाही माघारी धाडले. राहुल ५ तर रोहित २१ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर आलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीही २० धावांवर बाद झाला. आता भारताच्या २५ षटकात ३ बाद ५६ धावा झाल्या असून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे मैदानात आहेत.