करोनाच्या सावटामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करत शुक्रवारी जपानच्या नॅशनल स्टेडियमवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन झाले. दर वेळेप्रमाणे यंदा प्रेक्षकांचा पाठिंबा नसल्यामुळे ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यातील उत्सुकता काहीशी कमी झाली होती. मात्र तरीही सोहळ्यादरम्यान सादर करण्यात आलेले नयनरम्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्तबद्ध संचलन या बाबींनी जगभरातील चाहत्यांची मने जिंकली. ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताची कामगिरी निराशाजनक ठरली.

यांग किआनच्या नावे ऑलिम्पिकचे पहिले सुवर्णपदक

चीनची युवा नेमबाज यांग किआनने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक जिंकले. भारताचे अव्वल नेमबाज अपूर्वी चंडेला आणि इलेव्हनिल वलारीवन यांना या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. रशियाच्या अनास्तासिया गलाशिनाने रौप्य तर स्वित्झर्लंडच्या नीना क्रिस्टनने कांस्यपदक जिंकले.

ज्युडोत भारताच्या सुशीला देवीचा पराभव

टोकियो ऑलिम्पिकमधील ज्युडो स्पर्धेत भारताच्या सुशीला देवीला आपला पहिला सामना गमावलाल आहे. ४८ किलो वजनाच्या एलिमिनेशन फेरीत सुशीलाची लढत हंगेरीच्या इवा कार्नोस्कीशी होती. मात्र तिला पराभवाचा धक्का पचवावा लागला. या स्पर्धेत सुशीला भारताची एकमेव उमेदवार होती.

तिरंदाजीत दीपिका-प्रवीणची आगेकूच

दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव यांच्या भारतीय तिरंदाजी मिश्र संघाने चायनीज ताइपेच्या लिन चिया-एन आणि तांग चिह-चुन या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारतीय जोडीने ५-३ अशा फरकाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केल. दीपिका-प्रवीणचा पुढच्या फेरीत दक्षिण कोरियाशी सामना होणार आहे. टायब्रेकर जिंकण्यासाठी भारतीय जोडीला पर्फेक्ट १० गुणांची आवश्यक होती.

टेटेमध्ये बत्रा-कमलची निराशा

टोकियो ऑलिम्पिकच्या मिश्र दुहेरी प्रकारातील टेबल टेनिसच्या अंतिम-१६ फेरीत भारताची अचंता कमल आणि मनिका बत्रा ही जोडी पराभूत झाली. या ऑलिम्पिक स्पर्धेतील बत्रा आणि कमलचा हा पहिला सामना होता. तैवान लिन यू तझू आणि चेंग चिंग या जोडीने बत्रा-कमलचा ४-० असा पराभव केला.

हेही वाचा – जंटलमन्स गेम..! श्रीलंकेच्या कर्णधाराशी द्रविडनं केली बातचीत, नेटिझन्स म्हणाले…

हॉकीत भारताची न्यूझीलंडवर मात

टोकियो ऑलिम्पिकमधील हॉकी स्पर्धेच्या पूल-अ च्या पहिल्या सामन्यात भारतीय पुरुष संघाने न्यूझीलंडचा ३-२ने पराभव केला. भारताकडून हरमनप्रीत सिंगने दोन, तर रुपिंदरपाल सिंगने एक गोल केला. १०व्या मिनिटाला रूपिंदरने गोल केला, तर हरमनप्रीतने २६व्या आणि ३३व्या मिनिटाला गोल करत भारताला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडकडून केन रसेलने आणि स्टीफन जेनेसने गोल केला. भारताचा पूल-अ मधील पुढील सामना आता २५ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.