‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी गिल, राहुल, पंत, सिराजला संधी; शमी दुसऱ्या कसोटीला मुकणार

नवी दिल्ली : अ‍ॅडलेडच्या पहिल्या कसोटी सामन्यामधील मानहानीकारक पराभवानंतर ‘बॉक्सिंग डे’च्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात घाऊक बदल होणार आहेत. अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा आणि युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील उर्वरित कसोटी सामन्यांसाठी वगळण्याची दाट शक्यता आहे. परंतु सराव सामन्यांत लक्ष वेधणारा युवा सलामीवीर शुभमन गिलसह के. एल. राहुल, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज यांना दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

अनुभवी फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात पोहोचला असला तरी विलगीकरणाच्या नियमामुळे सिडनीच्या तिसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध होऊ शकेल. या परिस्थितीत उपलब्ध पर्यायांमध्येच दुसऱ्या कसोटीसाठी भारताला संघबांधणी करावी लागणार आहे. साहाच्या फलंदाजीबाबत संघ व्यवस्थापन समाधानी नसल्यामुळे मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शतक नोंदवणाऱ्या पंतला संधी मिळू शकेल. कर्णधार विराट कोहलीची जागा सध्या सातत्याने धावा काढणारा के. एल. राहुल घेऊ शकेल. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्या जागी सिराजला संघात स्थान मिळवू शकते.  साहा-पंत यांचा योग्य वापर करावा, असा सल्ला निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिला आहे.

कोहलीच्या अनुपस्थितीत हनुमा विहारीला पाचव्या क्रमांकावर बढती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुलला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरता येईल. मयांक अगरवाल, शुभमन, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे पहिल्या चार क्रमांकावर फलंदाजी करतील.

साहा परदेशात अपयशी

३६ वर्षीय साहाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अस्ताकडे वाटचाल करीत आहे. गेल्या काही वर्षांत दुखापतीमुळेही त्याच्या कारकीर्दीचे बरेच नुकसान झाले आहे. या पाश्र्वभूमीवर पुढील तीन कसोटी सामन्यांत साहाऐवजी पंतला प्राधान्य दिले जाईल. या मालिकेत पंतने चुणूक दाखवल्यास इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याच्यावर यष्टिरक्षणाची भिस्त असेल. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये साहाची कामगिरी खालावल्याचे निष्पन्न होत आहे. या देशांमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावले नाही.

पृथ्वीचे ढिसाळ तंत्र

मुंबईचा २१ वर्षीय फलंदाज पृथ्वीच्या फलंदाजीचे तंत्र आणि सामन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याबाबतचे गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वर्षांच्या पूर्वार्धात शुभमनला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो प्रभाव दाखवण्यात अपयशी ठरला होता, परंतु कसोटी क्रिकेटमध्येही त्याला संधी देण्याची आवश्यकता आहे. इंडियन प्रीमियर लीगपासून (आयपीएल) पृथ्वीच्या क्षेत्ररक्षणातील ढिलाईसुद्धा समोर येत आहे. फलंदाजांचे मोठे फटके अडवताना क्षेत्ररक्षणातील त्याचा धिमेपणा स्पष्ट होतो.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अशा देशांमध्ये पंत हा आमचा प्रथमपसंतीचा यष्टिरक्षक असेल, परंतु देशामधील कसोटी सामन्यांसाठी सहाव्या क्रमांकानंतर फलंदाजाची क्वचितच आवश्यकता असते. त्यामुळे साहासारखा विशेष यष्टिरक्षक उपयुक्त ठरतो.

      – एमएसके प्रसाद, राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष