भारताविरूद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला. भारताने दिलेले १४९ धावांचे आव्हान अनुभवी मुश्फिकुर रहीमच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने सहज पूर्ण केले. या विजयासह बांगलादेशने भारताविरूद्ध टी २० इतिहासातील पहिला सामना जिंकला. या आधीच्या ८ सामन्यात भारताने बांगलादेशला धूळ चारली होता.

बांगलादेशने भारतावर पहिलावहिला विजय मिळवला. या विजयाबद्दल सामनावीर मुश्फिकूर रहीमने विशेष गोष्ट सामना संपल्यावर सांगितली. “आम्ही प्रचंड मोठ्या चाहत्या वर्गापुढे खेळत होतो. आमच्यासाठी हा खूपच आनंददायी क्षण होता. सामना रंगतदार अवस्थेत असताना सौम्या सरकार आणि मी सामना जमेल तितका शेवटपर्यंत खेचण्याचा निर्णय घेतला. त्यातच आम्हाला आवश्यक ते मोठे षटक मिळाले, म्हणून आम्ही भारतावर विजय मिळवू शकलो”, असे मुश्फिकूरने सांगितले.

हे वाचा – Video : अन् सामना भारताच्या हातून निसटला…

१९ व्या षटकात खलील अहमदच्या गोलंदाजीवर शेवटच्या ४ चेंडूवर मुश्फिकूरने ४ चौकार खेचले होते. त्यामुळे शेवटच्या षटकात त्यांना खूपच कमी धावांची गरज होती. त्या धावा कर्णधार मोहम्मदुल्लाहने पूर्ण केल्या. “सौम्या सरकारने मला चांगली साथ दिली. मोहम्मद नईमनेही धमाकेदार खेळी केली. विशेष म्हणजे त्याआधी गोलंदाजांनी केलेली कामगिरीने विजयाची पायाभरणी ठरली. मी माझ्यातील क्रिकेटपटूला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. बांगलादेश प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करेल अशी मी आशा करतो”, असेही मुश्फिकूर म्हणाला.

Video : धवन-पंतमध्ये धाव घेताना गोंधळ अन्… ; चुक कोणाची तुम्हीच ठरवा

दरम्यान, त्याआधी पहिल्या डावात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (९), लोकेश राहुल (१५), श्रेयस अय्यर (२२) झटपट बाद झाले. शिखर धवन आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी होत असतानाच मैदानात त्या दोघांमध्ये धाव घेण्यावरून गोंधळ झाला. त्यामुळे शिखर धवन धावबाद झाला. धवनने ३ चौकार आणि १ षटकार लगावत ४२ चेंडूत ४१ धावा केल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा मुंबईकर शिवम दुबेही एक धाव करून बाद झाला. पाठोपाठ दिल्लीकर ऋषभ पंतही २७ धावांवर माघारी परतला. शेवटच्या टप्प्यात क्रुणाल पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षटकात ६ बाद १४८ पर्यंत मजल मारली होती. मालिकेतील दुसरा सामना गुरूवारी होणार आहे.