लीड्स कसोटीचा पहिला दिवस पूर्णपणे इंग्लंडच्या नावावर झाला. यजमानांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतलेल्या भारताला पहिल्या डावात फक्त ७८ धावांवर गुंडाळले आणि नंतर दिवसअखेर ४२ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा सलामीवीर हसीब हमीद नाबाद ६० आणि रोरी बर्न्स ५२ धावांवर नाबाद आहे, तर जेम्स अँडरसनने गोलंदाजीत फक्त ६ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. ओव्हर्टननेही ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. पहिल्या दिवशी इंग्लिश खेळाडूंच्या सर्वोत्तम खेळाव्यतिरिक्त, आणखी एक घटना चर्चेत राहिली. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या सत्रात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज इंग्लंडच्या चाहत्यांशी भिडला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खेळाच्या पहिल्या दिवशी, जेव्हा मोहम्मद सिराज सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा इंग्लंडच्या चाहत्यांनी त्याच्यासंबंधी भाष्य केले. टीम इंडियाची वाईट अवस्था झाल्यानंतर इंग्लंडचे चाहते त्याला चिडवत होते, पण सिराज गप्प बसला नाही. त्यानेही इंग्लिश चाहत्यांना बोट दाखवून उत्तर दिले. चाहते त्याला स्कोअर काय आहे, असे विचारत होते. तेव्हा सिराजमे त्यांना १-० असे उत्तर दिले.

 

हेही वाचा – ENG vs IND : ‘‘ताबडतोब सचिनला फोन कर आणि…”, चिंताग्रस्त गावसकरांचा विराटला सल्ला

भारतीय वेगवान गोलंदाज लीड्सच्या खेळपट्टीवर पूर्णपणे फ्लॉप ठरले. इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांनी चारच्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. शमीच्या ११ षटकांत ३९ धावा कुटल्या गेल्या. बुमराहने १२ षटकांत फक्त १९ धावा दिल्या पण त्यालाही संघाला एकही विकेट मिळवता आली नाही.

इंग्लंडचे सलामीवीर हसीब हमीद आणि रोरी बर्न्स यांनी शानदार शतकी भागीदारी केली आणि दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतकेही पूर्ण केली. मालिकेत प्रथमच इंग्लंडसाठी शतकी भागीदारी झाली आणि इंग्लंडच्या सलामीवीराने ५० धावांचा टप्पा गाठला.