टोक्यो : भारतीय पुरुष हॉकी संघाला अ-गटातील दुसऱ्या लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून १-७ अशा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

पहिल्या सत्रानंतर भारतीय बचावाच्या चिंधडय़ा उडवत ऑस्ट्रेलियाने गोलधडाका लावला. अखेरच्या तीन सत्रांमध्ये सहा गोल करत ऑस्ट्रेलियाने टोक्यो ऑलिम्पिकमधील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी एप्रिल २०१९मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारताचा हा सर्वात मानहानीकार पराभव ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे या लढतीवर वर्चस्व गाजवले. डॅनिएल बीएले (१०व्या मिनिटाला), जेरेमी हेवर्ड (२१व्या मिनिटाला), अँड्रय़ू फ्लिन ऑगिल्वी (२३व्या मिनिटाला), जोशूआ बेल्ट्झ (२६व्या मिनिटाला), ब्लेक गोव्हर्स (४०व्या आणि ४२व्या मिनिटाला) आणि टिम ब्रँड (५१व्या मिनिटाला) यांनी गोल लगावत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

भारताकडून दिलप्रीत सिंगने ३४व्या मिनिटाला एकमेव गोल केला. भारताने याआधीच्या लढतीत न्यूझीलंडवर ३-२ अशी सरशी साधली होती. आता भारताचा पुढील सामना स्पेनशी मंगळवारी होणार आहे. महिला हॉकी संघाची पुढील लढत सोमवारी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरील जर्मनीशी होणार आहे.

मानाची उपांत्य फेरी हुकली

टोक्यो : श्रीहरी नटराज आणि माना पटेल यांना आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी उंचावण्यात अपयश आल्यामुळे जलतरणाच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले. २० वर्षीय श्रीहरीने ५४.३१ सेकंद वेळ नोंदवली. जूनमध्ये टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरताना श्रीहरीने ५३.७७ सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. त्याहून ०.६४ सेकंद अधिक वेळ त्याला लागला. कर्नाटकच्या श्रीहरीला गटात सहावे, परंतु एकंदर २७व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. २१ वर्षीय मानाने १.०५.२० सेकंद वेळ नोंदवली. मानाला आपल्या गटात दुसरे स्थान मिळाले, परंतु एकंदर ३९व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

सानिया-अंकिता पराभूत

टोक्यो : झुंजार कामगिरीनंतरही सानिया मिर्झा आणि पदार्पणवीर अंकिता रैना जोडीची टोक्यो ऑलिम्पिक स्पध्रेच्या महिला दुहेरीतील वाटचाल संपुष्टात आली. एरियाकी टेनिस केंद्रावरील लढतीत सानिया-अंकिता जोडीने पहिला सेट ६-० असा जिंकत आघाडी घेतली; परंतु युक्रेनच्या नाडिया आणि लिऊडमायला या किशेनॉक भगिनींनी नाटय़मय पुनरागमन करीत पुढील दोन सेट ७-६ (०), १०-८ अशा फरकाने जिंकत सामन्यावर प्रभुत्व मिळवले.

प्रणती अपयशी

टोक्यो : कलात्मक जिम्नॅस्टिक्स स्पध्रेत रविवारी भारताचे एकमेव आशास्थान असलेल्या प्रणती नायकला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. एरिआके जिम्नॅस्टिक्स केंद्रावर झालेल्या या स्पध्रेत पश्चिम बंगालच्या २६ वर्षीय प्रणतीने एकूण ४२.५६५ गुण कमावले. यापैकी फ्लोअर एक्सरसाइजमध्ये १०.६३३, व्हॉल्टमध्ये १३.४६६, अनइव्हन बार्समध्ये ९.०३३ आणि बॅलन्स बीममध्ये ९.४३३ गुण मिळवले. त्यामुळे सध्या ती तळाच्या अध्र्या स्पर्धकांमध्ये आहे.

नेत्रा २७वी, विष्णू १४वा

ईनोशिमा : टोक्यो ऑलिम्पिक स्पध्रेत रविवारी शिडाच्या बोटींच्या स्पर्धेत दोन शर्यतींनंतर नेत्रा कुमाननला २७वे स्थान मिळाले, तर पहिल्या शयतीनंतर विष्णू सरवानला १४वे स्थान मिळाले. महिलांमध्ये नेत्राने पहिल्या शर्यतीत ३३वे स्थान मिळवले होते, तर दुसऱ्या शर्यतीत १६वे स्थान मिळवले; परंतु एकूण ४९ निव्वळ गुणांच्या बळावर तिला २७वे स्थान देण्यात आले. पुरुषांमध्ये पहिल्या शर्यतीत विष्णू १४वा आला; परंतु ईनोशिमा याट बंदरावरील हवामान खराब झाल्यामुळे दुसरी शर्यत पुढे ढकलण्यात आली.