भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूंसाठी हे वर्ष अत्यंत आश्वासक ठरलेलं आहे. कारण वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनच्या नवीन क्रमवारीत भारताचे ७ खेळाडू हे पहिल्या ५० खेळाडूंच्या यादीत आलेले आहेत. यावेळी भारतीय खेळाडूंनी चिनी स्पर्धकांनाही मागे टाकत, पहिलं स्थान पटकावलेलं आहे. चीनचे ६ खेळाडू टॉप ५० खेळाडूंच्या यादीत आहेत. २७ जुलैला बॅडमिंटन फेडरेशनने आपल्या खेळाडूंची नवीन क्रमवारी जाहीर केली.

बॅडमिंटन म्हणलं की आतापर्यंत चीन, डेन्मार्क, चीन तैपेई, हाँगकाँग, मलेशिया या खेळाडूंचं वर्चस्व होतं. मात्र या सर्व देशांना कडवी टक्कर देऊन भारताच्या सात खेळाडूंनी टॉप ५० जणांच्या यादीत स्थान मिळवणं ही खरचं अभिमानाची गोष्ट मानली जातेय.

नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेत परुपल्ली कश्यपला उप-विजेतेपद मिळालं. अंतिम फेरीत भारताच्यात एच.एस.प्रणॉयने त्याचा पराभव केला. याआधी सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर कश्यपची ही पहिलीच अंतिम फेरी होती. या कामगिरीमुळे कश्यप क्रमवारीत ४७ व्या स्थानावर आलाय. याव्यतिरीक्त जागतिक क्रमवारीत भारताचे श्रीकांत कदंबी ८, अजय जयराम १६, एच.एस.प्रणॉय १७, बी.साईप्रणीत १९, समीर वर्मा २८, सौरभ वर्मा ३७ अशा क्रमांकावर आहेत.

भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीचं श्रेय हे बॅडमिंटन असोसिएशनने निर्माण करुन दिलेल्या सोयी-सुवीधा आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची मेहनत यांना जातं. याव्यतिरीक्त इंडोनेशियाच्या प्रशिक्षकांना भारतीय खेळाडूंना शिकवण्यासाठी पाचारण करण्याचा निर्णयही बऱ्याच अंशी काम करुन गेलेला दिसत आहे.