इंग्लंडविरुद्धच्या सर्व मालिकेसाठी वरिष्ठ महिला निवड समितीने भारतीय महिला संघाची घोषणा केल्यानंतर सर्वांना करोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्या सर्व संघ मुंबईमध्ये क्वारंटाईन आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी संघातील सदस्यांना लस देण्यात आली. तर लसीचा दुसरा डोस हा इंग्लंड येथे देण्यात येणार आहे.

महिला संघातील सदस्यांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लसीचा दुसरा डोस हा इंग्लंडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची निवड करण्यात आली आहे. ऑल इंडिया सिलेक्शन कमेटीने इंग्लंडमध्ये होणाऱ्या एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी २० सामन्यांसाठी भारतीय महिला संघाची निवड केली आहे. शेफाली वर्माला पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यासाठीच्या कर्णधार पदाची जबाबदारी मिताली राजकडे देण्यात आली आहे. तर टी २० साठी हरमनप्रीत कौरकडे कर्णधार पद असणार आहे.

भारतीय महिला संघ १६ जूनपासून ब्रिस्टॉल येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. कसोटी मालिकेनंतर पहिला एकदिवसीय सामना २७ जून रोजी ब्रिस्टॉलमध्ये, दुसरा एकदिवसीय सामना ३० जून रोजी टाँटन येथे आणि तिसरा एकदिवसीय सामना ३ जुलै रोजी वॉरसेस्टर येथे होईल. यानंतर ९ ते १५ जुलै दरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल.

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघ –

मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक) झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट आणि राधा यादव.

टी-२० मालिकेसाठी संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हार्लिन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक), शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव आणि सिमरन दिल बहादूर.