मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज कोलकाता नाइट रायडर्ससोबत सामना खेळत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गनने चेन्नईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. चेन्नईचे सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनीही या निर्णयाचे स्वागत करत दमदार सलामी दिली. मागील काही सामन्यांपासून फ्लॉप ठरलेल्या ऋतुराज गायकवाडने 11व्या षटकात आयपीएलमधील आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले.

 

मागील तीन सामन्यात ऋतुराजने 10, 5, 5 अशा धावा केल्या. त्यामुळे आज त्याला बाहेर बसवून धोनी नव्या फलंदाजाला संधी देईल, अशी चर्चा होती. मात्र, धोनीने ऋतुराजला अजून एक संधी दिली. या संधीचा फायदा उचलत ऋतुराजने कोलकाताच्या स्टार गोलंदाजांवर हल्ला चढवला. मागील काही सामन्यात ऋतुराज बचावात्मक फलंदाजी करत असल्याचे समोर आले होते, मात्र, कोलकाताविरुद्ध त्याने आक्रमक फलंदाजी केली. या सामन्यात त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांसह 64 धावांची खेळी केली. ऋतुराज आणि प्लेसिसने पहिल्या गड्यासाठी 115 धावांची भागीदारी रचली.

ऋतुराजच्या यशापाठी धोनी?

ऋतुराजच्या या खेळीमागे धोनीची रणनिती असल्याची चर्चा रंगत आहे. फॉर्म नसला तरी धोनी आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो, त्यामुळे खेळाडूंना दबाव न येता मुक्तपणे खेळण्याचे स्वातंत्र्य मिळते, अशी विधानेही क्रीडापंडितांनी दिली. याच कारणामुळे ऋतुराजने आज कोलकाताविरुद्ध शानदार खेळी केली. मोठा फटका खेळण्याच्या  नादात ऋतुराज वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.