आयपीएलच्या बाराव्या पर्वामध्ये युवराज सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबई इंडियन्सने आज झालेल्या आयपीएलच्या लिलावामध्ये एक कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले आहे. लिलावाच्या पहिल्या फेरीमध्ये युवराजला कोणत्याही संघाने विकत न घेतल्याने दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा त्याचा लिलाव करण्यात आला. विशेष म्हणजे युवराजसारख्या धडाकेबाज फलंदाजासाठी दुसऱ्या फेरीतही केवळ मुंबईने बोली लावली.

कारकीर्दीतील ऐन बहरात असताना युवराजवर १६ कोटी रुपयांची बोली लागली होती. गेल्या वर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला त्याच्या दोन कोटी रुपये या मूळ किमतीलाच संघात स्थान दिले होते; परंतु युवराजला आठ डावांमध्ये एकूण ६५ धावाच करता आल्याने पंजाब संघाने त्याला संघात स्थान न देण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षीही युवराजला आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

जून २०१७ मध्ये भारतीय संघातून अखेरचा सामना खेळलेल्या ३७ वर्षीय युवराजने आयपीएलमध्ये स्थान मिळण्याच्या उद्देशाने स्वत:ची मूळ किंमत एक कोटी केली. युवराजला संघ मिळण्याबाबत क्रिकेटविश्वात साशंका प्रकट केली जात होती. त्यानुसार त्याला पहिल्या फेरीत कोणीही विकत घेतले नसले तरी दुसऱ्या फेरीत त्याच्यावर मुंबईने विश्वास दाखवत आपल्या संघात घेतले. आता युवराजसमोर चांगली कामगिरी करुन दाखवण्याचे आव्हन असणार आहे. त्यामुळे आता मुंबईकर झालेल्या युवराजच्या खेळाकडे मुंबईकरांचे खास लक्ष असणार आहे.

Story img Loader