न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात केलेल्या संथ खेळीनंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा रंगायला लागली. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या खेळाडूंनीही धोनीला टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्याबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी महेंद्रसिंह धोनीला आपला पाठींबा दर्शवला आहे. धोनीवर टीका करण्याच्या नादात आपण भारतीय संघात चांगली कामगिरी न करणाऱ्या तरुण खेळाडूंना पाठीशी घालत असल्याचं परखड मत, गावसकर यांनी व्यक्त केलंय. ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहीनीशी गावसकर बोलत होते.

अवश्य वाचा – धोनीने संघातली आपली जागा ओळखावी, विरेंद्र सेहवागचा सल्ला

“भारतात एखाद्या खेळाडूने वयाची तिशी ओलांडली की अचानक आपल्याला त्याच्या खेळात उणीवा भासायला लागतात. भारतीय चाहत्यांच्या एखाद्या खेळाडूकडून इतक्या अपेक्षा असतात की त्याप्रमाणे तो खेळाडू खेळला नाही की लगेच त्याच्या निवृत्तीची मागणी सुरु होते. पण अशा प्रवृत्तीमुळे आपण एखादा तरुण खेळाडू वाईट कामगिरी करत असला तरीही त्याला नजरअंदाज करतो. हार्दिक पांड्यासारखा खेळाडू एक धाव काढून बाद होतो. समोरच्या गोलंदाजाचा गुगली बॉल त्याला समजत नाही, मात्र हार्दिकच्या कामगिरीवर बोलण्यापेक्षा आपण धोनीच्या निवृत्तीवर चर्चा करतो. माझ्या दृष्टीने ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.” एनडीटीव्ही वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत गावसकर यांनी धोनीला आपला पाठींबा दर्शवला.

अवश्य वाचा – धोनीनं टी-२० क्रिकेट खेळण्याबाबत फेरविचार करावा- व्ही.व्ही.एस. लक्ष्मण

आज तिरुअनंतपुरमच्या मैदानात अखेरचा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात बाजी मारुन कोणता संघ मालिका खिशात घालेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास वन-डे पाठोपाठ टी-२० मालिकाही भारताच्या नावे होईल. या विजयाचा फायदा भारताला आयसीसीच्या क्रमवारीत आपलं स्थान सुधारण्यासाठी होणार आहे. त्यामुळे या सामन्यात विराट कोहलीचा भारतीय संघ कशी कामगिरी करतोय हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – धोनीला टी-२० सोडण्याचा सल्ला देणाऱ्यांना भूवीचा शाब्दिक यॉर्कर