जर्मनी फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक जोकिम ल्यू यांची १५ वर्षांपासूनची कारकीर्द अखेर संपुष्टात आली. ल्यू यांनी काही वर्षांपूर्वीच प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, असे फुटबॉलमधील जाणकारांचे म्हणणे आहे.

जर्मनीने यंदाच्या युरो चषकात बाद फेरीत प्रवेश केला असला तरी त्यांना मंगळवारी इंग्लंडकडून २-० असा पराभव पत्करावा लागला. ल्यू यांनी जर्मनीला २०१४च्या विश्वचषकाचे जेतेपद मिळवून दिले तसेच २०१६च्या युरो चषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून दिली. मात्र गेल्या विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीलाच गारद झालेला जर्मनीचा संघ अद्यापही सावरला नाही.

युरो चषकाच्या पात्रता फेरीत त्यांना स्पेनकडून गेल्या नोव्हेंबरमध्ये ०-६ असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. तसेच उत्तर मॅसेडोनियानेही त्यांच्यावर २-१ अशी मात केली होती. या निकालानंतरच युरो चषक ही आपली अखेरची स्पर्धा असेल, असे ल्यू यांनी जाहीर केले होते. या स्पर्धेसाठी त्यांनी थॉमस म्युलर आणि मॅट हमेल्स या अनुभवी खेळाडूंना संधी दिली होती. जगज्जेता फ्रान्स आणि युरोपियन स्पर्धेचा गतविजेता पोर्तुगाल तसेच हंगेरीचा समावेश असलेल्या खडतर गटातून जर्मनीने बाद फेरी गाठली होती. २००६च्या विश्वचषकानंतर जर्मनीला दुसऱ्यांदा प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारण्यात अपयश आले.