भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या कोरियाच्या किम जी ह्य़ुन यांनी मंगळवारी महिला एकेरीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

पती रिची मेर यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने ४५ वर्षीय किम तातडीने न्यूझीलंडला रवाना झाल्या असून त्यांच्या भारतात लवकर परतण्याच्या आशा कमीच आहेत. त्यामुळे आता २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकला वर्षभराहून कमी अवधी शिल्लक असताना किम यांनी राजीनामा दिल्यामुळे भारताच्या संघ व्यवस्थापनाला आता नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी झटावे लागणार आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे (बीएआय) किम यांची या वर्षीच फेब्रुवारीत भारताच्या महिला खेळाडूंसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूने स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले.

‘‘पतीच्या आजारपणामुळे किम यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त खरे आहे. जागतिक स्पर्धेदरम्यान रिची यांना हृदयविकाराचा झटका बसला होता. परंतु त्या वेळी व्यस्त असल्यामुळे किम यांना पतीची देखभाल करण्यासाठी जाता आले नाही. मात्र आता त्या किमान चार ते सहा महिने तरी न्यूझीलंडलाच राहणार असून पतीची तब्येत पूर्णपणे सुधारल्यानंतरच त्या भविष्यातील योजनेविषयी निर्णय घेतील,’’ असे भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद म्हणाले.

जगज्जेत्या सिंधूनेसुद्धा तिच्या भावना व्यक्त करताना रिची यांच्या तंदुरुस्तीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘‘किम यांच्याशी माझे घट्ट नाते होते. त्यांच्या अशा अर्धवटच माघारी जाण्याने मला फार दु:ख होते आहे. परंतु मी त्यांच्या पतीला लवकरात लवकर तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा देते,’’ असे सिंधू म्हणाली. परंतु खेळाडूच्या कारकीर्दीचा हा भाग असून नव्या प्रशिक्षकासह नव्याने सुरुवात करण्यासाठी मी उत्सुक आहे, असेही सिंधूने सांगितले.

किम यांच्या अनुपस्थितीत पुरुष एकेरीचे प्रशिक्षक पार्ट ते संग यांचे मार्गदर्शन सिंधू घेईल, असे तिचे वडील पी. व्ही. रामण यांनी सांगितले.

३ कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच राजीनामा देणाऱ्या किम या भारताच्या तिसऱ्या विदेशी प्रशिक्षका ठरल्या आहेत. यापूर्वी इंडोनेशियाच्या मुल्यो हंडोयो (२०१७) आणि मलेशियाचे टॅन किम हर (२०१८) यांनी अर्धवटच प्रशिक्षकपद सोडले होते.

किम यांच्याकडून अधिकृत राजीनामापत्र मिळालेले नाही!

कोरियाच्या किम यांनी भारताच्या महिला एकेरीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला असला तरी भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी किम यांच्याकडून अद्याप अधिकृत राजीनामापत्र मिळाले नसल्याचे सांगितले आहे.

‘‘किम यांच्या पतीची तब्येत बिघडली असल्याचे आम्हाला ठाऊक आहे; परंतु तूर्तास तरी संघटनेला अथवा भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) त्यांचे राजीनामापत्र मिळालेले नाही. अथवा यासंबंधी एखादे पत्र किंवा पूर्वकल्पनाही संघटनेला देण्यात आली नव्हती,’’ असे सिंघानिया म्हणाले. परंतु ऑलिम्पिकला अद्याप १० महिने शिल्लक असल्याने आम्ही किमशी संवाद कायम राखणार असून त्यांना लवकरात लवकर पुन्हा प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठीही विनंती करणार आहोत, असेही सिंघानिया यांनी सांगितले. २४ जुलैपासून टोक्यो ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे.