स्टार फुटबॉलपटू लियोनल मेसीचा बार्सिलोनासोबतचा करार संपुष्टात आला आहे. २० वर्षापासून मेसी बार्सिलोना क्लबसोबत खेळत होता. ३० जूनच्या डेडलाइनपूर्वी मेसीसोबत नवा करार करण्यास स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोना अपयशी ठरला आहे. ३४ वर्षीय मेसीने मागच्या वर्षी बार्सिलोना क्लब सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र क्लबने त्याला सोडण्यास नकार दिला होता. मेसी त्याच्या फुटबॉल कारकिर्दीत पहिल्यांदाच कोणत्याही क्लबसोबत नाही. त्यामुळे आता मेसी इतर कोणत्याही क्लबमधून खेळण्यास स्वतंत्र आहे. सध्या कोपा अमेरिका स्पर्धेत मेसी अर्जेंटीनाचं नेतृत्व करत आहे.

मेसी बार्सिलोना टीममध्ये परत येण्याची शक्यता आहे. मात्र करार नसल्याने मेसी ७५०४ दिवसानंतर पहिल्यांदाच कोणत्याही कराराशिवाय क्लबमध्ये खेळताना दिसेल. बार्सिलोना क्लबचे अध्यक्ष लापोर्ताने मेसीसोबत चर्चा केली, मात्र त्याला परत क्लबमध्ये आणण्यास अपयशी ठरले. मेसी आणि क्लबमध्ये अजूनही काही मुद्द्यांवर वाद आहे. मेसीने परतण्यास नकार दिल्याने क्लबला मोठा धक्का बसला आहे. मेसीच्या जाण्याने बार्सिलोना क्लब आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. क्लब सोडण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर संघावर त्याचे परिणाम दिसून आले होते. चॅम्पियन लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत बायरन म्यूनिचकडून ८-२ ने पराभव सहन करावा लागला होता. मेसीच्या कारकिर्दीतला हा सर्वात मोठा पराभव गणला जात आहे.

जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम ल्यू अखेर पायउतार

मेसी १३ वर्षांचा असल्यापासून बार्लिसलोना क्लबसोबत खेळत आहे. चार वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर मेसीने बार्सिलोना सिनिअर संघासोबत खेळण्यास सुरुवात केली होती. मेसीने १७ वर्षात ३५ किताब आपल्या नावे केले आहेत. त्याचबरोबर बार्सिलोना क्लबकडून खेळताना त्यांने ७७८ सामन्यात एकूण ६७२ गोल केले आहेत. पाचवेळा फीफा प्लेअर ऑफ द इअर असलेल्या मेसीने २०१७ या वर्षी नव्याने करार केला होता. हा करार ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आला होता. बार्सिलोनाने तेव्हा जवळपास ५ हजार ४०० कोटींचा करार केला होता.