अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोनाला अलविदा म्हटले. रविवारी माध्यमांशी बोलताना मेस्सीने बार्सिलोना सोडत असल्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी मेस्सीला रडू कोसळले. हा दिवस येईल असे कधीच वाटले नव्हते, मी क्लब सोडण्याचा विचारही केला नव्हता, असे मेस्सीने निरोपाच्या भाषणात म्हटले. मेस्सी गेली २१ वर्षे बार्सिलोना संघाशी संबंधित होता. त्याच्या कराराची मुदत ३० जून रोजी संपली आणि क्लबसोबतच्या नवीन करारावर सहमती होऊ शकली नाही. क्लबला अलविदा म्हणताता मेस्सीने आपल्या मानधनाबाबत मोठा खुलासा केला आहे.

जेव्हा मेस्सी बोलायला आला, तेव्हा बार्सिलोनाबरोबर जिंकलेल्या त्याच्या ट्रॉफीजही ठेवल्या होत्या. तो म्हणाला, ”क्लबसोबत चांगला आणि वाईट दोन्ही काळ पाहिला. पण लोकांचे प्रेम कायम राहिले. मला आशा आहे, की मी परत येईन आणि या क्लबचा एक भाग होऊ शकेन. या क्लबला जगातील सर्वोत्तम क्लब बनवण्यासाठी मी काहीही करू शकतो. पण सध्या माझ्याकडे सांगण्यासाठी शब्द नाहीत. मी माझे मानधन ५० टक्क्यांनी कमी करण्याची ऑफर दिली होती, पण यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.”

 

 

क्लब सोडण्याबाबत मेस्सी म्हणाला, ”जेव्हा हे घडले तेव्हा जणू माझे रक्त थंड झाले. मी खरोखर दुःखी होतो. हे माझ्यासाठी अजूनही कठीण आहे आणि मी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा मी घरी जाईन, तेव्हा मला आणखी वाईट वाटेल. मी या शहरात माझ्या तीन मुलांसोबत २१ वर्षे राहत होतो आणि येथील लोकांनी मला खूप प्रेम दिले. गेल्या वर्षी मला जायचे होते, पण या वर्षी नाही. मला हा क्लब सोडायचा नव्हता. मला हा क्लब आवडतो, पण आता माझी नवीन कथा सुरू होते.”

 

हेही वाचा – Olympics : “२०२४ मध्ये माझ्या पदकाचा रंग बदललेला असेल”, लव्हलिनाची जिद्द

बार्सिलोना संघावर मोठे कर्ज

बार्सिलोना संघ मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. त्यांच्यावर १.१८ बिलियन डॉलर्सचे (सुमारे ८००० कोटी रुपये) कर्ज आहे. मेस्सी वयाच्या १३व्या वर्षी बार्सिलोना क्लबमध्ये सामील झाला. त्याने २००४मध्ये वरिष्ठ क्लबसाठी खेळण्यास सुरुवात केली.

क्रीडा इतिहासातील सर्वात मोठा करार

लिओनेल मेस्सीने बार्सिलोनासोबत २०१७मध्ये ५५५ मिलियन युरोंचा (सुमारे ४९१० कोटी रुपये) शेवटचा करार केला होता. क्रीडा इतिहासातील हा सर्वात मोठा करार होता. त्याला एका हंगामासाठी १३८ मिलियन युरो (सुमारे १२२० कोटी रुपये) मिळायचे. मेस्सीने १७ वर्षात बार्सिलोनासह ३५ विजेतेपदे मिळवली आहेत. त्याने क्लबसाठी ७७८ सामन्यात विक्रमी ६७२ गोल केले आहेत. मेस्सीने स्पॅनिश लीगमध्ये ५२० सामन्यांत ४७४ गोल केले आहेत. यासह एका क्लबसोबत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. मेस्सी सहा वेळा बलोन डी’ओर जिंकणारा खेळाडू आहे. त्याने अर्जेंटिनासाठी ७६ आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत.