लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय निवृत्ती

हरणासारखे काटक पाय, वीजेसारखा सळसळता वावर आणि लोभसवाणं हास्य ही लिओनेल मेस्सीची गुणवैशिष्टय़े. गोल सगळेच करतात पण गोल करण्यासाठीचा त्याचा विचार, कृती आणि युक्ती विस्मयचकित करणारी. दशकभराच्या प्रदीर्घ कालखंडात गोल करण्यात जपलेल्या सातत्यामुळेच दिग्गजांच्या पंगतीत मेस्सी विराजमान झाला. बार्सिलोना क्लब आणि जेतेपदं समानार्थी शब्द वाटावेत अशा वाटचालीत मेस्सीचा वाटा निर्णायक आहे. बार्सिलोनासाठीच्या विलक्षण प्रभावी प्रदर्शनाच्या बळावरच मेस्सी दंतकथा बनला. पैसा, प्रसिद्धी, मानमरातब सगळीकडे मेस्सी नावाची जादू झाली. समकालीन ख्रिस्तियानो रोनाल्डोचा झंझावातही त्याने फिका ठरवला. पण एक सल त्याच्या मनात खोलवर उमटली होती. बार्सिलोनाकरता खेळतानाचे तंत्रकौशल्य अर्जेटिनाच्या कामी का येत नाही हा प्रश्न २०१४ विश्वचषकात जर्मनीकडून पराभूत झाल्यावर त्याच्या मनात डोकावला होता. पैशासाठी खेळणारा मेस्सी देशासाठी खेळणारा मेस्सी व्हावा यासाठी यंदाच्या कोपा अमेरिका स्पर्धेत त्याने जीवाचे रान केले. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत चिलीविरुद्ध अर्जेटिनाचा संघ जेतेपदापासून एक घर दूर होता. गोल करायला तोच होता. परंतु सगळीच चित्रं पूर्ण होत नाहीत याचा प्रत्यय आला. अर्जेटिनाला जेतेपद मिळवून देऊ शकत नाही ही अपूर्णतेची जाणीव मेस्सीला झाली. शून्यात नजर लागलेल्या विमनस्क मेस्सीची प्रतिमा पुन्हा पुन्हा अपूर्णतेची जाणीव करुन देईल.