‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेला पुण्यात उत्साहात सुरुवात

पुणे : ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रंगतदार कुस्त्या झाल्या. मागच्या वर्षीच्या ५७ किलो आणि ७९ किलो माती गटातील रौप्यपदक विजेत्यांनी शुक्रवारी सुवर्णपदकावर नाव कोरले. माती विभागात ५७ किलो वजनी गटात सोलापूरच्या आबासाहेब अटकळेने आणि ७९ किलो गटात उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सुवर्णपदक पटकावले.

पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे सुरू झालेल्या या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी ५७ व ७९ किलो वजनी गटाच्या माती विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले. त्यात ७९ किला गटाच्या अंतिम सामन्यात उस्मानाबादच्या हणमंतने सोलापूरच्या सागर चौगुलेला ५-० गुणाने हरवत जेतेपद पटकावले. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत नाशिकच्या धर्मा शिंदेने परभणीच्या गिरिधारी दुबेवर ८-२ अशी मात केली.

५७ किलो गटात आबासाहेबने उपांत्य फेरीत बीडच्या अतिश तोडकरवर विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली. मग अंतिम फेरीत आबासाहेब व संतोष हिरूगुडे यांच्यामध्ये ८-८ अशी बरोबरी झाली. आबासाहेबने शेवटचा गुण मिळवल्यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात आले. हे दोघेही काका पवार यांच्या कात्रज येथील तालमीचे मल्ल आहेत.

शनिवारी सकाळच्या सत्रात झालेल्या ७९ किलोच्या गादी विभागात रामचंद्र कांबळे विरुद्ध रवींद्र खरे यांच्यात अंतिम लढत होणार आहे. अर्थातच कुस्तीप्रेमींसाठी त्यामुळे सकाळपासूनच रंगतदार लढती असणार आहेत. तत्पूर्वी, या गटात सोलापूरच्या रामचंद्र कांबळेने कोल्हापूरच्या नीलेश पवारला १३-४ असे नमवत अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत उस्मानाबादच्या रवींद्र खरेने साताऱ्याच्या श्रीधर मुळेला ४-१ नमवले.

अंतिम निकाल

* ७९ किलो (माती विभाग) : १. हणमंत पुरी (उस्मानाबाद), २. सागर चौगुले (सोलापूर) ३. धर्मा शिंदे (नाशिक)

* ५७ किलो (माती विभाग) : १. आबासाहेब अटकळे (सोलापूर), २. संतोष हिरूगडे (कोल्हापूर), ३. ओंकार लाड (नाशिक)

 

 

Story img Loader