अ‍ॅडलेड कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सध्या संघावर चहुबाजूंनी टीका होते आहे. पहिल्या डावात विराट कोहलीचं अर्धशतक आणि रहाणे-पुजाराच्या संयमी खेळाच्या जोरावर भारताने २४४ धावांपर्यंत मजल मारली. मात्र भारताचे हेच धुरंधर फलंदाज दुसऱ्या डावात सपशेल अयपशी ठरले. विराट कोहली ४ धावा काढून माघारी परतला तर रहाणे-पुजारा शून्यावर बाद झाले. उप-कर्णधार अजिंक्य रहाणेचं फॉर्मात नसणं आणि कामगिरीत सातत्याचा अभाव हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी विराट व अजिंक्य यांच्या शैलीतला फरक सांगून विराट हा अधिक यशस्वी का आहे याचं कारण सांगितलं आहे.

अवश्य वाचा – विराटच्या अनुपस्थितीत भारताला फलंदाजी बळकट करायला पंतची गरज – रिकी पाँटींग

“अजिंक्य रहाणे इंटरेस्टिंग खेळाडू आहे. फलंदाजी करत असताना त्याचा पुढचा पाय पाहा, त्याला पुढे येऊन फटके खेळायला आवडतात हे समजतं. फक्त लेंग्थची समस्या आहे, विराट पुढे येऊन खेळतो आणि अजिंक्यला पुढे येऊन खेळायचं असतं या दोन गोष्टींमध्ये मोठा फरक आहे. तुम्ही तुमची बॅट पुढे करता आणि बॉल येऊन बॅटवर लागावा अशी काहीशी अजिंक्यची शैली आहे. अजिंक्य अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे अशा खडतर परिस्थितीमध्ये हनुमा विहारीपेक्षा अजिंक्य रहाणेसारख्या खेळाडूंकडून अधिक अपेक्षा केल्या जाणार.” मांजरेकर Sony Sports वाहिनीवर कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, पहिला सामना संपल्यानंतर विराट कोहली भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्व येईल. २६ डिसेंबरपासून भारतीय संघ आपला दुसरा कसोटी सामना खेळेल. पृथ्वी शॉचा खराब फॉर्म, मोहम्मद शमीचं दुखापतीमुळे संघाबाहेर जाणं यामुळे अंतिम ११ जणांचा संघ निवडताना भारतीय संघ व्यवस्थापनासमोर मोठा पेच असणार आहे.

अवश्य वाचा – भारतीय संघ पुनरागमन करु शकतो, पण…; शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया