नवी दिल्ली : पोलंडमध्ये दाखल झाल्यानंतर निर्धारित वजन गटापेक्षा मेरी कोमचे वजन २ किलोने जास्त होते. त्यामुळे पात्रता निकषातूनच बाद होण्याची स्थिती असताना तिने उपलब्ध ४ तासांमध्ये हे अतिरिक्त वजन घटवून ४८ किलो वजनी गटाची पात्रता राखली. आणि त्यानंतर सर्वोत्तम कामगिरीचे दर्शन घडवत थेट सुवर्णपदकाला गवसणी घातल्याचे वास्तव मेरीनेच भारतात परतल्यानंतर सांगितले.

याबाबत बोलताना मेरीने सांगितले ‘‘भारतातून पोलंडमध्ये पहाटे ३.३० वाजता जेव्हा आम्ही पोहोचलो. त्यावेळी माझे वजन जवळपास ५० किलो होते. तर वजनासह पात्रतेची फेरी सकाळी ७.३० वाजता होणार होती. त्यामुळे मी स्पर्धेतूनच बाहेर होण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी मी सलग एक तासभर दोरीवरच्या उडय़ा मारणे आणि अन्य पूरक व्यायाम करीत ४ तासात माझे वजन २ किलोने घटवून पात्रता निकष पूर्ण केला.

त्यानंतर मी एकेक टप्पा पूर्ण करीत सुवर्णपदक पटकावले. मला नेहमी प्रतिस्पध्र्याचा खेळ अभ्यासून त्याला नमवायला अधिक आवडते. माझ्या शरीराने साथ दिल्यास मी २०२०च्या ऑलिम्पिकपर्यंत तरी खेळण्याचा निर्धार केला आहे. मला माझी कमजोरी आणि क्षमता दोन्हींचे पुरेपूर भान आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला महिलांच्या गटात एकही पदक मिळाले नसल्याची खंत आहे. लवकरच दिल्लीत विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा होणार असून ती माझ्यासाठी चाचणी असेल.’’