टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मिराबाई चानूला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता आहे. वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी चीनची खेळाडू झीयू हौ हिची डोपिंग टेस्ट होणार असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर ही चर्चा रंगली आहे. जर झीयू हौ डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आली तर दुसऱ्या क्रमांकावर विजेती राहिलेल्या मिराबाई चानूचं मेडल अपडेट केलं जाईल आणि सुवर्णपदक दिलं जाईल. असं झालं तर मिराबाई चानूसाठी हा ऐतिहासिक क्षण असेल. यासोबतच वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी मिराबाई चानू पहिली भारतीय खेळाडू ठरणार आहे. मिराबाई चानूची ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. मिराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले आणि समस्त भारतीयांना सुखद भेट दिली. मणिपूरच्या या पोलादी महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलण्याची कामगिरी करताना कुठेही चेहऱ्यावरील आत्मविश्वास कमी पडू दिला नाही. तिने ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन अॅण्ड जर्क प्रकारात उचलले. एका जिद्दीची कहाणी! वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे दुसरे पदक चानूने भारताच्या खात्यावरील २९व्या ऑलिम्पिक पदकाची नोंद केली. कर्णम मल्लेश्वरीने २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे दुसरे पदक आहे. भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे १८वे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरले. भारतीय महिला क्रीडापटूने मिळवलेले हे सहावे ऑलिम्पिक पदक ठरले. एक कोटींचं बक्षीस जाहीर मिराबाई चानू यांच्यासाठी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी एक कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी मिराबाई चानूला नव्या नोकरीची ऑफर दिली जाणार असल्याचंही सांगितलं. सध्या मिराबाई चानू भारतीय रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस (टीसी) म्हणून काम करत आहे. एन बिरेन सिंग यांनी मिराबाई चानू रौप्यपदक घेऊन घरी परतल्यानंतर तिच्यासोबत झालेल्या संवादाचा व्हिडीओही शेअर केला. “तू यापुढे रेल्वे स्थानक किंवा ट्रेनमध्ये तिकीट गोळा करायची गरज नाही,” असं मुख्यमंत्री मिराबाई चानूला व्हिडीओत सांगत आहेत. “मी तुमच्यासाठी एक विशेष पोस्ट राखीव ठेवत आहेत,” असंही आश्वासन यावेळी त्यांनी दिलं असून माहिती मात्र गुपित ठेवली. So good to speak to our Champion @mirabai_chanu today.@narendramodi @AmitShah @ianuragthakur @JPNadda @blsanthosh pic.twitter.com/1phL16ibh3 — N.Biren Singh (@NBirenSingh) July 24, 2021 मिराबाईची वेटलिफ्टिंगमध्ये कारकीर्द घडावी, म्हणून पाच वर्षांपूर्वी तिच्या आईने आपले दागिने विकले होते. ऑलिम्पिकमध्ये रुपेरी यश मिळवताना मिराबाईच्या आईचे पाठबळ सहज लक्ष वेधत होती. आईने भेट म्हणून दिलेले ऑलिम्पिकच्या पंचवर्तुळांचे कानातले तिने या वेळी परीधान केले होते. त्यामुळे आई सैखोम ओंगबी टोंबी लेईमाला आपले अश्रू आवरणे कठीण गेले. ‘‘२०१६च्या रिओ ऑलिम्पिकआधी हे कानातले मी मिराबाईला दिले होते. तिला यश मिळावे यासाठी मी ते सोन्याचे बनवले होते. तिने मिळवलेले पदक पाहताना मी आणि माझे पती आनंदाश्रूंत न्हाऊन गेलो. मेहनतीचे चीज झाले,’’ अशी प्रतिक्रिया तिच्या आईने व्यक्त केली.