टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास रचणारी भारताची स्टार वेटलिफ्टर मिराबाई चानू मायदेशी परतली आहे. तिने गुरुवारी एक फोटो शेअर केला, ज्यात ती घरचे जेवण करताना दिसत होती. ४९ किलो गटात रौप्यपदक जिंकणार्‍या मिराबाईच्या या फोटोवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती देशातील पहिली आणि एकमेव वेटलिफ्टर आहे.

मणिपूरच्या मिराबाईने ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिने खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले आणि व्यायामासाठी कठोर परिश्रम घेतले. ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या मिराबाईने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती आपल्या घरी जेवताना दिसली आहे. जवळजवळ दोन वर्षांनंतर घरात जेवत असल्याचे मिराबाईने सांगितले आहे.

”हे हास्य तेव्हा असते, जेव्हा तुम्ही दोन वर्षानंतर घरच्या जेवणाचा आस्वाद घेता”, असे मिराबाईने आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. तिच्या समोर एका मोठ्या थाळीत भात, भाजी दिसत आहेत. यापूर्वी तिने पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

यापूर्वी मिराबाईने बुधवारी एक फोटो शेअर केला होता, ज्यात ती तिच्या कुटुंबासोबत जेवण करताना दिसलीहोती. हा फोटो शेअर करताना ती म्हणाली, ”जवळपास दोन वर्षानंतर माझ्या कुटुंबाला भेटण्याची भावना शब्दात वर्णन करणे कठीण आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला नेहमीच पाठिंबा दिला, त्या सर्वांची मी आभारी आहे. अम्मा-बाबा, मला या पातळीवर आणण्यासाठी कठोर परिश्रम केल्याबद्दल धन्यवाद.”