मिराबाई चानू सैखोम हिने शनिवारी ऑलिम्पिक रौप्यपदकाला गवसणी घालताना ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या कर्णम मल्लेश्वरीचा वारसा २१ वर्षांनंतर चालवला. १९९४ आणि ९५मध्ये मल्लेश्वरीने जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत सलग दोनदा सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली होती. मिराबाईने २०१७ मध्ये जागतिक सुवर्णपदक पटकावत आशा उंचावल्या होत्या.

मल्लेश्वरी ते चानू यांच्या ऑलिम्पिक पदकांमधील दोन दशकांच्या भारतीय वेटलिफ्टिंगचा इतिहास नजरेखालून घालताना एकीकडे या दोघींच्या ऑलिम्पिकमधील अभूतपूर्व यशामुळे देशाला अभिमान वाटतो, परंतु दुसरीकडे अनेक वेटलिफ्टिंगपटूंनी उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणामुळे भारताची मान शरमेने खाली झुकवल्याचे लक्षात येते.

१८९६ च्या पहिल्या ऑलिम्पिकपासून पुरुषांसाठी वेटलिफ्टिंग हा खेळ अस्तित्वात आहे; पण २०००च्या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच महिलांसाठी वेटलिफ्टिंगच्या पदकांचे द्वार खुले झाले आणि आंध्र प्रदेशमधील एका छोटय़ाशा गावातील मल्लेश्वरीने भारतासाठी कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिलेने प्राप्त केलेले हे पहिले पदक म्हणून सुवर्णाक्षरांनी अधोरेखित झाले. या यशानंतर मणिपूरसारख्या ईशान्येच्या राज्याने मिराबाईच्या रूपात रुपेरी यश मिळवले.

मिराबाईचा जन्म पूर्व इम्फाळ येथे नाँगपॉक कॅकशिंग गावात सैखोम कुटुंबात ८ ऑगस्ट १९९४ या दिवशी झाला. मिराबाईला पाच भावंडे. यापैकी तीन बहिणी आणि दोन भाऊ. शालेय जीवनात मिराने जेव्हा वेटलिफ्टिंग खेळाचा वसा उचलला, तेव्हा तिच्या गावात याचा सराव किंवा प्रशिक्षण देणारे केंद्र नव्हते. मणिपूरमध्ये वेटलिफ्टिंगपटू कुंजराणी देवीचा आदर्श मानणारा मोठा वर्ग आहे. मिराबाईनेसुद्धा कुंजराणीकडूनच प्रेरणा घेतली. ती इतके वजन कसे काय पेलू शकते, याच इच्छाशक्तीने मिराने वेटलिफ्टिंगला प्रारंभ केला, तेव्हा आपल्याला पालकांना ते पटवून देण्याचे महत्त्वाचे आव्हान तिच्यापुढे होते आणि त्यांनी तिला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

वयाच्या १३व्या वर्षी ती दररोज २२ किलोमीटरचे अंतर दोन बस बदली करून प्रवास करायची आणि सराव केंद्र गाठायची. येथूनच तिच्या स्वप्नांचा प्रवास सुरू झाला. कनिष्ठ गटातील त्या दिवसांपासूनच तिच्या खेळातील सातत्य कायम होते. कनिष्ठ गटातील मिराच्या व्यावसायिक कारकीर्दीला जेव्हा प्रारंभ झाला, तेव्हा तिच्यापुढे अनंत अडचणी होत्या. तिचे प्रशिक्षक तिला आहाराचा तक्ता द्यायचे. त्यात चिकन आणि दूध हे महत्त्वाचे घटक असायचे. मात्र त्या तक्त्याला न्याय देऊ शकणारी आर्थिक पुंजी तिच्या कुटुंबीयांकडे नव्हती; परंतु तिने हिमतीने अशा अनेक अडचणींवर मात केली. २०१३ मध्ये  कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिला सर्वोत्तम लिफ्टर हा मान मिळाला. २०११च्या आंतरराष्ट्रीय युवा अजिंक्यपद स्पर्धेत आणि कनिष्ठ गटाच्या दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदकावर नाव कोरले. तिच्या याच कामगिरीमुळे ती भारताचे भविष्य असल्याची ग्वाही क्रीडा क्षेत्राला मिळाली होती. मिराने ताश्कंद येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत कुंजराणीचा स्नॅचमधील विक्रम मोडीत काढत ८४ किलो वजन उचलले होते. याचप्रमाणे एकूण १९० किलो वजन उचलण्याच्या तिच्या विक्रमाचीही बरोबरी केली. मग २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने रौप्यपदकाची कमाई केली. याचप्रमाणे २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पध्रेत तिने सुवर्णपदक पटकावले. त्याआधी, २०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली होती. मात्र तिच्याकडून घोर निराशा झाली; पण या नैराश्यातून धडा घेत तिने टोक्योत पदकाची स्वप्नपूर्ती केली. मिराबाईचे हे ऑलिम्पिक पदक वेटलिफ्टिंग खेळाला ऊर्जा देईल, अशी आशा आहे.