कॅरेबियन प्रीमियर लीगमधील (सीपीएल) संघ बार्बाडोस ट्रायडंट्सने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरशी करार केला आहे. आमिर पहिल्यांदाच सीपीएलमध्ये खेळेल. आमिर १९० टी-२० सामन्यांत २२० बळी घेतले आहेत. आमिर सध्या इंग्लंडचे नागरिकत्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आगामी काळात आयपीएल खेळण्याविषयी सांगितले होते. आमिरशिवाय पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू शोएब मलिक पुन्हा एकदा गयाना वॉरियर्सकडून खेळताना दिसणार आहे.

हेही वाचा – ‘आयपीएल’चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून?

सीपीएलचा यंदाचा हंगाम २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान आयोजित केले जाईल. या हंगामात ३३ सामने खेळले जातील आणि सर्व सामने सेंट किट्स आणि नेव्हिस येथे होणार आहेत.

 

सीपीएलची आणखी एक टीम जमैका तलावाहसने अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला आपल्या संघात कायम ठेवले आहे. रसेल २०१३ पासून जमैकन संघाचा भाग होता, परंतु गेल्या हंगामात रसेल आणि संघ यांच्यातील संबंध बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या. रसेल व्यतिरिक्त कार्लोस ब्रेथवेट आणि रोव्हमन पॉवेल हे जमैका संघात असतील.

त्याचवेळी, त्रिनिबागो नाइट रायडर्सकडून खेळणारा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो या हंगामात सेंट किट्स अँड नेव्हिस पैट्रियट्सकडून खेळणार आहे. नाईट रायडर्सने आपला मूळ संघ कायम ठेवला असून यामध्ये त्यांचे फिरकीपटू सुनील नरिन, अकील हुसेन आणि खैरी पियरे यांचा समावेश आहे. मात्र, संघाने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-फलंदाज टिम सेफर्ट रिलिज केले आहे. दिनेश रामदिनला त्याच्या जागी परत आणले आहे.

हेही वाचा – ‘‘दोन मुलींचा बाप म्हणूनही…”, अश्विनला ‘या’ कारणामुळे लागत नाहीये रात्रभर झोप