आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीच्या चेन्नई संघाची कामगिरी अतिशय निराशजनक झाली आहे. चेन्नईच्या संघाला प्ले ऑफमध्येही जागा करता आली नाही. चेन्नईच्या निराशजनक कामगिरीनंतर धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीबद्दलच्या चर्चेला उधाण आलं होत. पण अखेरच्या साखळी सामन्यात धोनीनं पुढील वर्षीय आयपीएल खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. यावर चर्चा करताना भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
बांगर यांच्या मते पुढील वर्षी धोनी सीएसकेचं नेतृत्व करणार नाही. स्टार स्पोर्ट्सवरील ‘क्रिकेट कनेक्टेड’ या शो वर बोलताना बांगर म्हणाले की, आयपीएलच्या पुढील हंगामात धोनी सीएसके संघाचं नेतृत्व इतर खेळाडूंकडे सोपवू शकतो. भारतीय संघात असताना धोनीनं ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे पुढील वर्षी आपली जबाबदारी दुसऱ्या खेळाडूंवर सोपवू शकतो.
” २०११ नंतर धोनीनं भारतीय संघाच्या कर्णधार पदावर राहायचं की नाही हा विचार केला असेल. धोनीला माहित होतं की भारतीय संघासमोर मोठ्या अडचणी होत्या. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात जाऊन खेळायचं होतं. शिवाय त्यावेळी भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी कोणीही दावेदार नव्हतं. त्यामुळेचं पुढील काही वर्ष धोनीनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं. आणि योग्य वेळी विराट कोहलीकडे संघाची धुरा सोपवली. त्यानंतर धोनी खेळाडू म्हणून खेळत राहिला, असे बांगल म्हणाले.”
” माझ्या मते, धोनी पुढील वर्षी नेतृत्व करण्याची शक्यता कमीच आहे. धोनी फक्त खेळाडू म्हणून संघात राहिल. पुढील हंगामात धोनी संघाची कमान फाफ डु प्लेसिसकडे सोपवू शकतो. कारण सध्या त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, असं बांगर म्हणाले.”