भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर धोनीच्या खेळावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनी ज्यावेळी मैदानात आला त्यावेळी भारतीय संघाला विजयासाठी १० ते १२ च्या सरासरीनं धावा करण्याची गरज होती. मात्र, धोनीने सेट होण्यासाठी वेळ घेतला. परिणामी धावांची सरासरी वाढली.

या पार्श्वभूमीवर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण म्हणाले की, टी-२० सामन्यात धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे अपेक्षित आहे. धोनी मैदानात उतरल्यानंतर सेट होण्यासाठी वेळ घेतो. त्यानंतर तो फटकेबाजी करण्यास सुरुवात करतो. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीने विराट कोहलीला अधिक स्ट्राईक देणे गरजेचे होते.  सध्याच्या घडीला धोनी टी-२० क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसत असल्याचे लक्ष्मण यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, धोनीनं टी-२० क्रिकेटबद्दल फेरविचार करण्याची गरज आहे. टी-२० मध्ये त्याने युवा खेळाडूंना संधी द्यावी. धोनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचेही लक्ष्मण यांनी म्हटले. त्यामुळे आता त्याने फक्त एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला लक्ष्मण यांनी दिला.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहली एका बाजूने झुंज देत असताना धोनीने सुरुवातीला संथ फलंदाजी केली. विराट बाद झाल्यानंतर धोनीने आपल्या भात्यातील फटके दाखवले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने या सामन्यात ३७ चेंडूत ४९ धावा केल्या. पण हा सामना भारताला जिंकवून देण्यात धोनी अपयशी ठरला. भारताला हा सामना ४० धावांनी गमवावा लागला. हा सामना जिंकून न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.