पेनल्टी शूटआऊटमध्ये पंजाब अँड सिंध बँकेवर मात
वृत्तसंस्था, मुंबई</strong>
पेनल्टी शूटआऊटमध्ये निकाली ठरलेल्या रंगतदार सामन्यात इंडियन ऑइलने पंजाब अँड सिंध बँकेचा ९-७ असा पाडाव करून मुंबई सुवर्णचषक हॉकी स्पध्रेचे जेतेपद टिकवण्यात यश मिळवले.
बंगळूरुचा इंडियन ऑइल आणि जालंधरचा पंजाब अँड सिंध बँकेचा संघ यांच्यात मुख्य वेळेत ५-५ असा सामना बरोबरीत सुटला. इंडियन ऑइलचा संघ ४-५ असा पिछाडीवर असताना कर्णधार आणि ऑलिम्पिकपटू व्ही. आर. रघुनाथने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल साकारून बरोबरी साधली. त्यानंतर बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा नियम अवलंबण्यात आला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये इंडियन ऑइलकडून भरत छिक्रा, तलविंदर सिंग आणि एस. के. उथप्पा यांनी गोल केले. चौथ्या प्रयत्नातील विक्रमजीत सिंगचा प्रयत्न अयोग्य ठरवण्यात आला. रघुनाथने अखेरच्या संधीचे सोने करताना गोल साकारला. पंजाब अॅण्ड सिंध बँकेकडून रणजोत सिंग आणि गगनप्रीत सिंग यांनाच फक्त गोल करता आले.
मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेडकडून पंकज कुमार रजकला (इंडियन ऑइल) सर्वोत्तम गोलरक्षक, प्रताप लाक्राला (दक्षिण-मध्य मुंबई) सर्वोत्तम बचावपटू, देविंदर वाल्मीकीला (भारत पेट्रोलियम) सर्वोत्तम मध्यरक्षक आणि तलविंदर सिंगला (इंडियन ऑइल) सर्वोत्तम आक्रमकचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारत पेट्रोलियमच्या दर्शन गावकरला मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेचा सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.