करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरात महत्वाच्या क्रीडा स्पर्धा ठप्प झालेल्या आहेत. सर्व खेळाडू आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माही या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात आहे, रोहितने प्रत्येकाला सरकारी यंत्रणांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पिटरसनशी बोलताना रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीतला खडतर काळाबद्दल भाष्य केलं.

“२०११ च्या विश्वचषक संघात माझी निवड झाली नाही, हा माझ्यासाठी सर्वात खडतर काळ होता. माझ्या होमग्राऊंडवर स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला, भारताने विजेतेपद पटकावलं आणि मी त्या संघात नव्हतो, यासारखं दु:ख कुठेच नाही. पण यासाठी माझी खराब कामगिरी जबाबदार होती. मी त्या काळात फारसा चांगला खेळत नव्हतो.” रोहितने केविन पिटरसनने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. अंतिम फेरीत श्रीलंकेवर मात करत भारताने स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.

अवश्य वाचा – धोनी पुन्हा भारताकडून खेळेल असं वाटत नाही – हर्षा भोगले

यानंतर रोहितने आपल्या खेळात सुधारणा करत भारतीय संघात आपलं सलामीवीराचं स्थान पक्क केलं. २०१९ मध्ये इंग्लंड येथे पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहित चांगल्याच फॉर्मात होता. या स्पर्धेत त्याने ५ शतकं झळकावत खोऱ्याने धावा वसूल केल्या. मात्र न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहित आणि इतर भारतीय फलंदाज अपयशी ठरले. ज्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

Story img Loader