करोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण देशभरात आणीबाणीची परिस्थिती आहे. संपूर्ण जगभरातील क्रीडा स्पर्धा या कालखंडात रद्द करण्यात आल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूही या काळात घरी राहत आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. या विषाणूवर अद्याप ठोस औषध सापडलेलं नसल्यामुळे…या परिस्थितीवर नियंत्रण कधी येणार हे अद्याप कोणीही सांगू शकलेलं नाही. मात्र या खडतर परिस्थितीत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही मोलाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

“ही, परिस्थिती थोडीशी विचीत्र आहे…जगभरातील देशांनी अद्याप एक गोळी चालवलेली नाही, कुठेही दगड फेकला जात नाही, सगळी अत्याधुनिक शस्त्र पडून आहेत आणि संपूर्ण जग केवळ एका विषाणूमुळे ठप्प झालंय. माणूस आणि निसर्गाच्या संघर्षात हे वारंवार घडतंय, पण आयुष्यात शाश्वत असं काहीच नसतं. आपल्या सर्वांना घरी बसून राहण्यासाठी अशी गंभीर परिस्थिती निर्माण व्हावी लागली हे दुर्दैवी आहे. पण माझ्यामते आयुष्यात काही गोष्टी अशाच कठीण पद्धतीने शिकायला मिळतात. यातून एक गोष्ट शिकायला मिळते की प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या, तुम्हाला आता जे मिळतंय त्याबद्दल नेहमी ऋणी रहा आणि कोणतीही गोष्ट ग्राह्य धरुन चालू नका.” रवी शास्त्री Firtspost ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

गेल्या काही आठवड्यांमधली परिस्थिती ही आपल्या सर्वांसाठी डोळे उघडायला लावणारी आहे. भूतकाळात आपण कायकाय केलं हे पाहण्याचा आपल्या सर्वांना वेळ मिळाला आहे. काही लोकांनी कदाचीत पुढील सहा महिन्यांमध्ये काय करायचं याची तयारी करुन ठेवली होती. पण सध्या परिस्थिती अशी आलेली आहे की पुढील सहा दिवसांमध्ये काय होणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे सर्वांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवं असंही शास्त्री म्हणाले. बीसीसीआयने करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन आयपीएलचा तेरावा हंगामही अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे.