१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये रंगणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगासाठी बीसीसीआयने VIVO या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा करार मोडला आहे. यासंदर्भात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने परिपत्रक जाहीर करत माहिती दिली आहे. २०१८ साली बीसीसीआय आणि VIVO कंपनीचा ५ वर्षांचा करार झाला होता. आयपीएल स्पर्धेच्या स्पॉन्सरशिपसाठी VIVO ने बीसीसीआयला २१९९ कोटी रुपये दिले होते. प्रत्येक हंगामाला VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती.

“गव्हर्निंग काऊन्सीलच्या बैठकीनंतर आम्ही आणि VIVO च्या अधिकाऱ्यांनी वेगळी चर्चा केली. या चर्चेअंती एक वर्षासाठी VIVO आयपीएलला स्पॉन्सर करणार नाही हे ठरवण्यात आलंय. दोन्ही बाजूंनी सामोपचाराने यावर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. या वर्षाच्या मोबदल्यात VIVO कंपनीसोबतचा करार २०२३ पर्यंत वाढवता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करणार आहे.” बीसीसीआय अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली.

काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिक यांच्यात संघर्ष झाला. यामध्ये २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. या घटनेनंतर देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झालं. बीसीसीआयनेही VIVO कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी सोशल मीडियावर दबाव वाढत होता. परंतू गव्हर्निंग काऊन्सिलने पहिल्यांदा VIVO कंपनीची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतू यानंतर देशभरात चाहत्यांची नाराजी व इतर जाहीरातदारांची नाराजी यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे येत वर्षभरासाठी VIVO सोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला.