विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. न्यूझीलंड दौऱ्यात टी-२० मालिकेत ५-० ने बाजी मारल्यानंतर भारताला वन-डे मालिकेत पराभव स्विकारावा लागला. यानंतर वेलिंग्टन कसोटी सामन्यातही न्यूझीलंडने १० गडी राखून भारताचा धुव्वा उडवला. महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीला या दौऱ्यात सूर गवसलेला नाही. केवळ एका अर्धशतकाचा अपवाद वगळता विराट या मालिकेत अपयशी ठरलाय.

विराटच्या या खराब कामगिरीचा धागा पकडत श्रीलंकन मुक्त पत्रकार डॅनिअल अलेक्झांडरने विराटच्या खराब कामगिरीची आकडेवारी देत तो Overrated फलंदाज असल्याचं म्हटलं. यावेळी डॅनिअलने स्मिथ-बाबर आझम आणि केन विल्यमसन यांच्या कामगिरीचाही दाखला दिला.

मात्र विराट कोहलीवर केलेली ही टीका अ‍ॅलेक्स टुडोर या माजी ब्रिटीश क्रिकेटपटूला पटलेली नाही. केवळ एका दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर विराटसारख्या चांगल्या खेळाडूवर टीका करणं चुकीचं असल्याचं अ‍ॅलेक्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे.

टुडोर यांनी १० कसोटी आणि २८ वन-डे सामन्यांत इंग्लंडचं प्रतिनिधीत्व केलं आहे. कसोटी मालिकेत भारत सध्या ०-१ अशा पिछाडीवर आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपलं अव्वल स्थान कायम राखण्यासाठी दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवणं गरजेचं आहे. २९ फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्चच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.