विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर मात केली. ७ गडी राखून भारतीय संघाने हा सामना जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत श्रीलंकेला पहिल्यांदा १४२ धावांवर रोखलं, यानंतर फलंदाजांनी भक्कम सुरुवात करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. सामना संपल्यानंतर विराट कोहली युवा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक केलं.

मुळचा कर्नाटकचा आणि आयपीएलमध्ये कोलकात्याकडून खेळणारा प्रसिध कृष्णा

 

यावेळी बोलत असताना विराट कोहलीने आगामी टी-२० विश्वचषकात कोणत्या गोलंदाजाला संघात स्थान मिळेल याबद्दलचे संकेत दिले. “कोणत्या खेळाडूची गोलंदाजी शैली चांगली आहे, हे शोधणं महत्वाचं आहे. ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकासाठी एक खेळाडू सरप्राईज पॅकेज असेल. ज्याच्याकडे गती चांगली असेल आणि तो बाऊन्सर चेंडू टाकू शकतो अशाला संधी मिळू शकते. प्रसिध कृष्णा स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय. असे तरुण गोलंदाज उपलब्ध असणं ही देखील आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे.”

यावेळी बोलत असताना विराटने नवदीप सैनीचंही कौतुक केलं. “सैनीच्या खेळात आता आत्मविश्वास दिसायला लागला आहे. ज्यावेळी तो चांगल्या फॉर्मात असतो त्यावेळी तो सर्वोत्तम कामगिरी करतो हे आपण पाहिलेलं आहे”, विराट सामना संपल्यानंतर बोलत होता. या मालिकेतला अखेरचा सामना शुक्रवारी पुण्यात खेळवला जाणार आहे. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे अखेरच्या सामन्यात विजय मिळवणं श्रीलंकन संघासाठी अनिवार्य झालेलं आहे.