धोनी निवृत्ती कधी घेणार?? गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांना अखेरीस पूर्णविराम मिळाला आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत आपली निवृत्ती जाहीर केली. २०१९ विश्वचषकात उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं. यानंतर सुमारे वर्षभर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. गेल्या काही महिन्यांत करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात धोनी आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा सोबत रांची येथील फार्महाऊसमध्ये राहत होता.

धोनीच्या निवृत्तीची बातमी समजताच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी धोनीचं आतापर्यंतच्या खेळासाठी कौतुक केलं आहे. धोनी हा संपू्ण देश आणि झारखंडचा गौरव आहे. माझ्या मते धोनीला एक अखेरचा सामना खेळायला मिळायला हवा. मी बीसीसीआयला विनंती करतो की धोनीसाठी एक अखेरचा सामना आयोजित केला जावा, अशी मागणी सोरेन यांनी केली आहे.

धोनी सध्या आगामी आयपीएल हंगामाची तयारी करतो आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आयपीएल हंगामासाठी धोनी सज्ज झाला आहे. सध्या आपल्या चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकाऱ्यांसोबत तो सराव शिबीरात सहभागी झाला आहे. २० ऑगस्टनंतर चेन्नईचा संघ युएईला रवाना होणार आहे.