संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना धोनीने संध्याकाळी सात वाजल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. धोनीच्या निवृत्तीची बातमी समजताच सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. निवृत्तीसाठी धोनीने १५ ऑगस्ट आणि संध्याकाळी सात वाजून २९ मिनीटांचीच वेळ का निवडली यावर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीवर सध्या सर्व बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. संघातले त्याचे सहकारी, राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रेटी त्याला दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा देत आहेत.

पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू कैनत इम्तियाजनेही धोनीला निवृत्तीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीला आणि योगदानाला सलाम. क्रिकेटसाठी तुम्ही दिलेलं योगदान शब्दांत मांडता येणं कठीण आहे…अशा शब्दांत कैनतने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही धोनी आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालाधीत आयपीएलचा तेरावा हंगाम युएईत रंगणार आहे. निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी धोनीने CSK चे मालक आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनीवासन यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय. चेन्नईकडून पुढचे काही हंगाम खेळत राहणार असल्याचं धोनीने सांगितलं असून भविष्यातही संघाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला धोनीला आवडणार आहे…असंही धोनीने CSK प्रशासनाला कळवलं आहे.