युरो कपच्या यंदाच्या मौसमातील सर्वोत्तम गोल्सपैकी एक गोल सोमवारी खेळण्यात आलेल्या स्कॉटलंड विरुद्ध चेक प्रजासत्ताकदरम्यानच्या सामन्यात पहायला मिळाला. ‘ड’ गटातील या सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या संघाने स्कॉटलंडवर २-० असा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्कॉटलंड संघ दबावात खेळताना दिसून आला. चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक शिकने ४२ आणि ५२व्या मिनिटाला दोन अफलातून गोल नोंदवत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे ५२ व्या मिनिटाला पॅट्रिकने केलेला गोलची थेट युरो कपच्या रेकॉर्डबुकमध्ये नोंद झालीय.

४१ वर्षानंतर पुन्हा विक्रम

सामन्यातील दोन गोलपैकी शिकने ५२व्या मिनिटाला नोंदवलेला गोल जबरदस्त होता. मैदानाच्या अर्ध्या म्हणजे ४९.७ मीटर यार्डातून त्याने हा गोल केला. शिकने मारलेला फटकाल स्कॉटलंड संघाचा गोलरक्षक डी मार्शलने अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र तो पुढे आल्यामुळे त्याला हा गोल वाचवता आला नाही. मागे जाऊन गोल वाचवण्याच्या नादात मार्शल जाळ्यात घुसला होता. १९८० च्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये ४९.७ मीटर यार्डातून एक गोल करण्यात आला होता, त्यानंतर शिकने ४१ वर्षानंतर असा गोल मारण्यात यश मिळवले.

नक्की पाहा >> Photos : Fu** असा मजकूर असणारं T-shirt घालून फिरणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूला द्रविड झापतो तेव्हा…

युरोपियन चॅम्पिनयशीपमधील गोलच्या विक्रमाशी शिकच्या गोलने बरोबरी केली असली तरी तो युरो कपच्या इतिहासामधील सर्वात लांबून मारलेला गोल ठरला आहे. यासंदर्भातील माहिती युरो कपच्या आयोजकांनीच दिली आहे. शिकने लगावलेला गोल हा ४९.७ मीटरवरुन मारण्यात आला असून तो युरोमधील सर्वात लांबून मारलेला गोल ठरलाय. यापुर्वी हा विक्रम जर्मनीचा मिडफिल्डर असणाऱ्या टारस्टेन स्टींगच्या नावे होता. त्याने २००४ च्या युरो कपमध्ये ३८.६ मीटरवरुन गोल केला होता.

शिकला स्टार ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेक प्रजासत्ताकसाठी एकाच सामन्यात सलग गोल करणारा खेळाडू या विक्रमचीही शिकने जवळजवळ १५ वर्षानंतर बरोबर केलीय. यापूर्वी २००६ च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत चेक प्रजासत्ताकच्या थॉमस रॉस्कीने हा पराक्रम केलेला.

भारतीय उद्योजक हर्ष गोयंका यांनाही शिकच्या या गोलचं कौतुक केलं आहे.

फिफा क्रमवारीत स्कॉटलंडचा संघ ४४ व्या स्थानावर, तर चेक प्रजासत्ताकचा संघ ४० व्या स्थानावर आहे. स्कॉटलंडचा विश्वचषक आणि यूरो कप या दोन मोठ्या स्पर्धेतील ११ वा सामना होता. स्कॉटलंडने गेल्या नोव्हेंबरमध्ये सर्बियाविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात विजय मिळवल्यानंतर यूरो २०२० स्पर्धेसाठी पात्र झाला होता.

नक्की वाचा >> EURO CUP 2020 : गोलशून्य बरोबरीत सुटला स्पेन विरुद्ध स्वीडन सामना

चेक प्रजासत्ताक संघाचा इतिहास

चेक प्रजासत्ताक संघ पूर्वी चेकोस्लोवाकिया म्हणून खेळत होता. १९७६ मध्ये संघानेही यूरो कप जिंकला होता. १९९६ मध्ये त्यांनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. १९९६ पासून चेक प्रजासत्ताक संघ शेवटच्या ६ प्रमुख स्पर्धांपैकी ४ स्पर्धांमध्ये गट साखळीतून बाहेर पडला आहे. यूरो कपमध्ये संघाला शेवटच्या ९ सामन्यांपैकी ६ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते