दुसऱ्या डावात हाराकिरी करुन अवघ्या ३६ धावांवर डाव संपवणाऱ्या भारतीय संघावर सध्या टीकेची झोड उठत आहे. दुसऱ्या दिवसापर्यंत सामन्यावर वर्चस्व असलेल्या भारताने तिसऱ्या दिवशी अवघ्या काही तासांमध्ये सामना गमावला. सलामीवीर पृथ्वी शॉचं दोन्ही डावांत अपयशी ठरणं आणि क्षेत्ररक्षणात सुमार कामगिरी करणं चांगलंच चर्चेत आहे. सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनीही पृथ्वीवर टीका करत त्याला दुसऱ्या कसोटीसाठी संघाबाहेर करण्याची मागणी केली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पृथ्वी शॉने आपल्या सोशल मीडिया स्टोरीच्या माध्यमातून एक सूचक संदेश दिला आहे. तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना जर इतर लोकं तुम्हाला नाउमेद करत असतील तर याचा अर्थ तुम्ही ती गोष्ट करु शकता आणि इतर नाही…अशा आशयाचा संदेश पोस्ट करत पृथ्वीने आपले इरादे स्पष्ट केलेत.

दरम्यान पहिल्या कसोटीतील सुमार कामगिरीनंतर दुसऱ्या सामन्यासाठी पृथ्वी शॉला संघात जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागेवर सलामीसाठी शुबमन गिल याचा विचार केला जाण्याचे संकेत मिळत आहे.

अवश्य वाचा – India tour of Australia 2020 : साहा, पृथ्वीला वगळणार?