प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात पुणेरी पलटण संघाने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. मोनू गोयतच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हरयाणा स्टिलर्सला पुणेरी पलटण संघाने ३४-२२ असं एकतर्फी हरवलं. पुण्याकडून चढाईत नितीन तोमर, दिपक दहिया आणि गुरुनाथ मोरेने भरघोस गुणांची कमाई केली. त्यांना बचावफळीत गिरीश एर्नाक, संदीप नरवाल आणि रवी कुमारने चांगली साथ दिली. हरयाणाकडून विकास कंडोलाचा अपवाद वगळता एकही चढाईपटू फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत.

पहिल्या सत्रात हरयाणा स्टिलर्सच्या खेळाडूंनी आक्रमक सुरुवात केली. विकास कंडोला, वझीर सिंह यांनी काही आक्रमक चढाया रचत झटपट गुणांची कमाई केली. हरयाणाच्या खेळाडूंनी सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये पुण्याचा कर्णधार गिरीश एर्नाकला आपलं लक्ष्य बनवलं. मात्र पुण्याचा चढाईपटू गुरुनाथ मोरेने मध्यंतरीच्या वेळेत सामन्याचं चित्र पालटून टाकलं. हरयाणाच्या बचावफळीला खिंडार पाडत गुरुनाथने महत्वाच्या बचावपटूंना बाद केलं. याचसोबत गुरुनाथने बचावातही दोन गुणांची कमाई करुन संघाचं पारडं सामन्यात वरचढ केलं. पहिलं सत्र संपायला शेवटची दोन मिनीटं शिल्लक असेपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते, मात्र नितीन तोमरने केलेल्या एका चढाईत हरयाणाचा संघ गारद झाला. या चढाईच्या जोरावर पुणेरी पलटणने मध्यांतराला १५-९ अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रातही पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी सामन्यावरची आपली पकड कायम ठेवली. बचावफळीत पुण्याचा कर्णधार गिरीश एर्नाकने काही सुरेख पकडी केल्या. यानंतर चढाईत गुरुनाथ मोरे, नितीन तोमर, दिपक दहिया यांनी गुणांची कमाई करत हरयाणाच्या संघाला पुन्हा एकदा ऑलआऊट केलं. दुसऱ्या सत्रात हरयाणा स्टिलर्सच्या खेळाडूंनी काही क्षुल्लक चुका केल्या, त्यामुळे सामन्यात पुनरागमन करणं त्यांना जमलच नाही. विकास कंडोलाचा अपवाद वगळता एकही चढाईपटू हरयाणाकडून गुणांची कमाई करु शकला नाही. अखेरीस पुण्याने सामन्यात ३४-२२ अशी बाजी मारली.