भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद भूषवल्यानंतर, माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडकडे बीसीसीआय आणखी एक महत्वाची जबाबदारी टाकण्याच्या तयारीत आहे. बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत द्रविडची वर्णी लागण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. बीसीसीआयने यासंदर्भातली अधिकृत घोषणा केलेली नसली, तरीही एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट प्रशासकीय समिती राहुल द्रविडच्या नियुक्तीची लवकर घोषणा करण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत द्रविड कोणत्या पदावर काम करेल हे अजुन निश्चीत झालेलं नाहीये. क्रिकेट प्रशासकीय समिती राहुल द्रविडच्या भूमिकेविषयी निर्णय घेणार आहे. राहुल द्रविडकडे, देशभरातील क्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. “गेली काही वर्ष राहुल द्रविड भारतीय युवा संघाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळतो आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या कामकाजात त्याला संधी दिली जाईल हे जवळपास निश्चीत होतं. त्यामुळे भविष्यकाळात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची पूर्ण जबाबदारी राहुल द्रविडकडे असेल.” बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली.

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षाखालील भारतीय संघाने अतिशय आश्वासक कामगिरी केली आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. मयांक अग्रवाल, शुभमन गिल यांसारख्या अनेक तरुण खेळाडूंना राहुलने मार्गदर्शन केलं होतं. याचसोबत २०१८ साली झालेल्या आशिया चषकातही राहुलच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आगामी काळात राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काय बदल घडवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.