अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशिद खानच्या शानदार फलंदाजीमुळे ससेक्स संघ २०१८ नंतर टी-२० ब्लास्टमध्ये आपली पहिली उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी झाला. उपांत्यपूर्व फेरीत ससेक्सने यॉर्कशायरवर ५ गडी राखून मात केली. यॉर्कशायरने ७ गडी गमावून १७७ धावा केल्या. यॉर्कशायरसाठी टॉम कोल्हेर केडमोर आणि गॅरी बॅलन्सने अर्धशतके केली. ससेक्ससाठी या धावसंख्येचा पाठलाग करणे कठीण झाले होते, पण राशिद खानने आपली चमक दाखवली. त्याने ९ चेंडूत २७ धावा करून यॉर्कशायरच्या स्वप्नांना धुळीस मिळवले. त्याच्या डावात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

१८व्या षटकात राशिद फलंदाजीसाठी आला, तेव्हा ससेक्सच्या चार विकेट पडल्या होत्या. विजयासाठी २१ चेंडूत ४३ धावांची गरज होती. त्याने जॉर्डन थॉम्पसनचा चेंडू सीमापार केला. यानंतर त्याने आणखी एक षटकार ठोकला. पुढील षटकात, राशिदने धोनीचा ट्रेडमार्क ‘हेलिकॉप्टर शॉट’ खेळत थॉम्पसनला आणखी षटकार ठोकला.

 

हेही वाचा – ENG vs IND 3rd Test : विराटनं जिंकली नाणेफेक, रवीचंद्रन अश्विन संघाबाहेर

या खेळीमुळे राशिद खान पुन्हा एकदा टी-२० क्रिकेटचा सुपरहिट खेळाडू असल्याचे सिद्ध झाले. टी-२० ब्लास्टच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याच्या हेलिकॉप्टर शॉटने पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली. ९ चेंडूत नाबाद २७ धावा काढत तो ‘सामनावीर’ ठरला. गोलंदाजी करताना त्याला ४ षटकांत २५ धावा देऊन एक विकेटही मिळाली.

ससेक्सने सुरुवातीलाच ८.३ षटकांत ७२ धावांची भागीदारी करून यॉर्कशायरला दबावाखाली आणले होते. फिलिप सॉल्ट आणि कर्णधार ल्यूक राइट यांनी संघाला शानदार सुरुवात दिली. पण जॉर्डन थॉम्पसन आणि आदिल रशीदने झटपट विकेट घेतल्या. पण शेवटी राशिद खानच्या खेळीमुळे ससेक्सला सेमीफायनल गाठता आली.